
पुण्यात बँक कर्मचारी आक्रमक, जोरदार निदर्शने; नेमकं मागण्या काय?
पुणे येथील स्टेट बँकेच्या ट्रेझरी शाखेसमोर सर्व बँक कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. मार्च 2024 मध्ये झालेल्या द्विपक्षीय करारामध्ये पाच दिवसीय बँकिंग आठवड्याची मागणी मान्य करण्यात आली होती. मात्र, कराराला जवळपास दोन वर्षे पूर्ण होत असतानाही अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळेच बँक कर्मचाऱ्यांना संपाचा मार्ग स्वीकारावा लागला, अशी माहिती स्टेट बँक वर्कर्स ऑर्गनायझेशनचे सरचिटणीस राजेश मुळे यांनी दिली.
बँक कर्मचाऱ्यांवर सध्या कामाचा प्रचंड ताण असून, पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना त्यांच्या कौटुंबिक व वैयक्तिक आयुष्याला वेळ देता येईल, असेही त्यांनी नमूद केले. इन्शुरन्स, रिझर्व्ह बँक, तसेच शेअर मार्केटसह अनेक वित्तीय संस्थांमध्ये पाच दिवसीय कामकाजाची अंमलबजावणी होत असताना, बँकिंग क्षेत्रात मात्र याबाबत होत असलेल्या दिरंगाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. केंद्र सरकारने लवकरात लवकर पाच दिवसीय बँकिंग आठवड्याची अंमलबजावणी न केल्यास, भविष्यात आणखी तीव्र स्वरूपाची आंदोलने व संप करण्यात येतील, असा इशाराही राजेश मुळे यांनी दिला.