सौजन्य - नवराष्ट्र टीम
पाटस स्टेशन परिसरात यापूर्वी दोन सिमेंट कंपन्या कार्यरत आहेत. आता आणखी एका कंपनीने या भागातील काही शेतजमिनी खरेदी केल्या आहेत. मात्र कोणतीही शासकीय मोजणी न झालेल्या आणि पाटस व कानगाव गावांच्या शिवेवरील क्षेत्रात कंपनीच्या ठेकेदारांकडून तार कंपाऊंडचे काम सुरू केले आहे. या कामादरम्यान संबंधित ठेकेदाराने बाऊन्सर आणि काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांची नेमणूक केली असून, ते शेतकऱ्यांच्या खासगी क्षेत्रात प्रवेश करून तार कंपाऊंडसाठी खड्डे खोदत आहेत. हे क्षेत्र आमचेच असल्याचा दावा करत महिला शेतकऱ्यांना शिवीगाळ व धमकावण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शनिवारी (दि. २४) महिला शेतकरी व शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू असलेले तार कंपाऊंडचे काम बंद पाडले. तसेच पाटस–कानगाव हा शिव रस्ता बंद करण्यात आला. या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करून शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी असलेले अंतर्गत रस्तेही बंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने बागायती क्षेत्र व उभी पिके धोक्यात आली आहेत.
गैरकृत्यांमुळे परिसरातील शेतकरी त्रस्त
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, संबंधित कंपनीने बेकायदेशीररित्या भुमिहीन व वनविभागाच्या जमिनीची खरेदी केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कंपनीच्या संभाव्य गैरकृत्यांमुळे परिसरातील शेतकरी त्रस्त आहेत. कंपनी व ठेकेदारांना राजकीय वरदहस्त असून, कोणतीही मोजणी किंवा नोटीस न देता मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांच्या खासगी क्षेत्रात घुसखोरी केली जात आहे.
याशिवाय पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या व शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी खोदलेल्या पोट चाऱ्याही नष्ट करण्यात आल्याचा आरोप केला आहे. यास विरोध केल्यास शेतकऱ्यांना धमकावण्यात येत असल्याच्या तक्रारीही पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत.
कंपनीचे ठेकेदार व त्यांचे गुंड आमच्या शेतात येऊन ‘तुम्ही येथे शेती करू नका, हे क्षेत्र कंपनीचे आहे, येथून निघून जा, नाहीतर तुमचे काहीतरी वाईट होईल’ अशी उघड धमकी देत आहेत. त्यांच्या दहशतीमुळे महिला शेतकरी शेतात काम करताना भयभीत आहेत. या प्रकरणात मोजणीवर हरकती दाखल असून, कंपनीविरोधात दौंड येथील दिवाणी न्यायालयात दावा प्रलंबित आहे. असे असतानाही कंपनी पैसा व राजकीय वरदहस्ताच्या बळावर बाऊन्सर व गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वापर करून जाणीवपूर्वक दहशत निर्माण करत आहे. – आबासाहेब शितोळे-पाटील, शेतकरी






