भाजपने लोकसभा निवडणुकीतील गाफिलपणाची उणीव भरुन काढली; महाविकास आघाडीला बसला फटका
पुणे/दीपक मुनोत: लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदानाची टक्केवारी लक्षणीय वाढल्यानंतर आणि त्याचा जाहीर गवगवा झाला होता. याला बुध्दीमान भाजपने प्रत्युत्तर दिले. ब्राह्मण वर्ग लक्षणीय प्रमाणात असलेल्या पुणे शहरामध्ये विधानसभा निवडणुकीत हिंदू मतदानाचा टक्का पध्दतशीरपणे वाढवला गेला. त्याचाही मोठा प्रभाव महायुतीच्या विजयात उमटला.
भाजपने काही जाहीर कार्यक्रमांतून लोकसभेच्या निवडणुकीत आपण गाफील राहिलो,आता गाफील राहून चालणार नाही हे जनतेच्या मनावर ठसवण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला होता. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ६० पर्यंत गेली. वाढलेली ही टक्केवारी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची झोप उडवणारी ठरली. दुसरीकडे, उमेदवारांमध्ये असलेला अति आत्मविश्वास आणि मी पणाची झालेली बाधा आणि पक्षापेक्षा आपण मोठे असल्याच्या भ्रमातून त्यांनी पक्षीय नेत्यांना टाळणे तसेच तिन्ही पक्षांमध्ये सुप्तपणे झालेले पाय ओढण्याचे उद्योग आणि बंडखोरी, यामुळे महाविकास आघाडीचा दणकून पराभव झाल्याचे पुणे शहरामध्ये दिसून येते.
या उलट कोणत्याही मतदारसंघात बंडखोरी होणार नाही याची दक्षता विशेषतः भाजपने घेतल्याने आणि पक्षांतर्गत धुसफूस होणार नाही याची काळजी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने घेतल्याने महायुतीला भरभरून प्रतिसाद मिळाला. रिपब्लिकन पक्ष आठवले गटही बऱ्याच प्रमाणात प्रचारासाठी सक्रिय झाला होता. प्रचारसभेदरम्यान किंवा कार्यक्रमात मविआचे नेते सोबत दिसत असले तरी त्यांच्यात सामंजस्य दिसून येत नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काॅंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात पक्षांतर्गत एकी नसल्याचे दिसून आले.
हेही वाचा: कोणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? पुण्यातील ‘या’ आमदारांची नावे अधिक चर्चेत, उत्सुकता वाढली
विधानसभेतील जागावाटपाबाबत महाविकास आघाडीत बिघाडी दिसून आली. जागावाटपावरून शेवटपर्यंत मविआत गोंधळ दिसत होता. यावरुन त्यांच्यात झालेले मतभेदही दिसून येत होते. जनतेच्या नजरेतून या गोष्टी सुटल्या नाहीत. याचे परिणाम निकालात दिसून आले. कसबा, हडपसर आणि खडकवासला मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रिंगणात होते. शिवाजीनगर कसबा आणि पर्वती मतदारसंघात काँग्रेस मध्ये बंडखोरी झाली. मनसेच्या उमेदवारांनी आणि बंडखोरांनी घेतलेल्या मतांचा परिणाम काॅंग्रेसचे रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) चे प्रशांत जगताप, अश्विनी कदम आणि काॅंग्रेसचे दत्ता बहिरट यांना बसला.
महायुतीतील भारतीय जनता पक्षाने नियोजन बद्ध प्रचार केला. जाहीर सभांमध्ये तिन्ही पक्षाचे नेते सुरुवातीपासून एकत्र दिसत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे हे अनेक उमेदवारांच्या रॅली मध्ये सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक शांतपणे आपापल्या विधानसभा मतदारसंघात प्रचार करत होते. स.प.महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची उपरणी परिधान केलेले श्रोते मोठ्या प्रमाणावर दिसून आले होते. या साऱ्याचा एकत्रित परिणाम होऊन महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले.
महाविकास आघाडीचे नेते लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक स्तरावर मिळालेल्या यशाच्या धुंदीत होते. तर गणेशोत्सवात पुणे शहरातील बहुसंख्य गणेश मंडळांपर्यंत पध्दतशीरपणे जाऊन भाजपने नकळत विधानसभा निवडणुकीचा प्रचारही सुरू केला होता.