अंबरनाथमधील भाजप कॉंग्रेस युतीवर शिवसेना ठाकरे गट नेते अंबादास दानवेंनी टीका केली (फोटो - सोशल मीडिया)
काय म्हणाले अंबादास दानवे?
कॉंग्रेस आणि भाजपच्या युतीवर टीका करताना अंबादासा दानवे म्हणाले की, “महाविकास आघाडीमध्ये आम्ही काँग्रेससोबत असताना आमच्यावर सातत्याने टीका केली जात होती. आता हीच काँग्रेस अंबरनाथमध्ये भाजपसोबत आहे. संजय राऊत यांनी याबाबत अतिशय योग्य शब्द वापरला आहे — दुतोंडी गांडूळ. भाजप म्हणजे दुतोंडी गांडूळ आहे. गांडूळ जसं इकडच्या तोंडानेही चालतं आणि तिकडच्या तोंडानेही चालतं, तसंच भाजप करत आहे. सध्या गांडूळाचं काम भाजप करत आहे; फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात करत आहे,” असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला आहे.
हे देखील वाचा : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दणका! प्रचार गीतातील एका शब्दाने निवडणूक आयोगाचा स्पष्ट नकार
भाजप आणि एमआयएम नेहमीच एकत्र
भाजपकडून अकोल्याच्या आकोटमध्ये थेट एमआयएमशी युती करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी यावर टीका केली जात आहे. याबाबत अंबादास दानवे म्हणाले की, “अकोट आणि जुना भाईंदरमध्ये अशा प्रकारे युती झाली आहे. त्यामुळे आमच्यासोबत आलेले मुसलमान ‘ना पाक’ आणि त्यांच्या सोबत गेलेले ‘पाक’ अशी भाषा वापरणारेच लोक एमआयएम आणि ओवैसींवर टीका करत होते. एमआयएम विकासावर बोलत नाही. एमआयएमविरोधात भाजपचे उमेदवार नाहीत आणि भाजपविरोधात एमआयएमचे उमेदवार नाहीत. ओवैसी त्यांच्या हितासाठीच काम करतात, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. आता भाजप आणि एमआयएम उघडपणे एकत्र काम करत आहेत आणि त्याची सुरुवातही झाली आहे,” असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला आहे.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील परिस्थिती
त्याचबरोबर महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये वाद सुरु असल्याचे दिसून येत आहे. उघड उघड भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. याबाबत दानवे म्हणाले की, “वडेट्टीवार यांनी काहीही चुकीचे बोललेले नाही. भाजप हा ‘यूज अँड थ्रो’ करणारा पक्ष आहे. ज्या पद्धतीने सध्या एकमेकांवर टीका-टिप्पणी सुरू आहे, त्यावरूनच दोन्ही पक्ष भाजपसाठी ओझे झाले असल्याचं दिसतं. हे भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्यांतून स्पष्ट होत आहे. कधीतरी भाजप हे ओझं खाली उतरवेल, अशीच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील परिस्थिती आहे,” असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.
हे देखील वाचा : “भाजप हा दुतोंडी गांडूळ…! MIM सोबत केलेल्या युतीमुळे खासदार राऊतांचा चढला पारा
त्याचबरोबर मनपा आयुक्तांकडून अंबादास दानवेंना नोटीस आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना दानवे म्हणाले की, “मला अद्याप कोणतीही अधिकृत नोटीस आलेली नाही. आयुक्तांचा फोन आला होता; मात्र फोनवरून मी कोणतेही स्पष्टीकरण देणार नाही. अधिकृत नोटीस आल्यानंतर सर्व पुरावे आणि खुलासे सादर करण्यास मी पूर्णपणे तयार आहे,” अशी स्पष्ट भूमिका अंबादास दानवे यांनी घेतली.






