
नेत्यांना दौरा तासाचा, नागरिकांना त्रास अनेक दिवसांचा; धुळीत अडकला आंबेठाण चौक
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चाकण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घाईगडबडीत हा मुरूम टाकण्यात आला होता. मात्र दौरा संपताच रस्त्याची जबाबदारी कुणीही घेतली नाही. वाहनांची वर्दळ वाढताच माती मिश्रित मुरूम उखडून त्यातील दगड उडू लागले असून, संपूर्ण चौक धुळीच्या ढगात हरवला आहे.
आरोग्याच्या तक्रारी वाढल्या
या सतत उडणाऱ्या धुळीमुळे डोळ्यांची जळजळ, श्वसनाचे त्रास, खोकला अशा तक्रारी वाढल्या आहेत. चौकात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना दिवसभर तोंडावर रुमाल बांधून काम करावे लागत आहे. लगतच्या दुकानदारांनाही याचा मोठा फटका बसला असून, धुळीमुळे ग्राहक थांबत नसल्याने व्यवसाय मंदावल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
कायमस्वरूपी डांबरीकरण करणे गरजेचे
नेत्यांचा दौरा तासभराचा असतो; मात्र त्यातून निर्माण होणारा त्रास नागरिकांना अनेक दिवस भोगावा लागतो, असे चित्र पुन्हा एकदा आंबेठाण चौकात दिसून आले आहे. तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी कायमस्वरूपी डांबरीकरण करणे, धूळ नियंत्रणासाठी नियमित पाणी फवारणी करणे तसेच कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास स्थानिक नागरिक आंदोलनाचा मार्ग अवलंबतील, असा इशाराही देण्यात आला आहे.