पुण्यासह संभाजीनगरमध्येही भाजप-शिवसेनेची युती फिस्कटली; दोन्ही पक्ष आमनेसामने (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, काँग्रेससह सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. त्यातच महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) १५ जानेवारीला होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर आणि पुणे महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. कारण दोन्ही पक्षांमधील जागावाटपाची चर्चा फिस्कटली आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिका निवडणुकीत हे पक्ष वेगळे दिसणार आहेत.
महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. त्यात सत्तेत सहभागी दोन्ही पक्षांचे नेते आता युती तुटल्यावरून एकमेकांवर आरोप करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी दावा केला की, भाजपने या भागात वाढत्या प्रवाभामुळे अहंकारातून युती तोडली. संजय शिरसाट यांनी आम्ही महापालिका निवडणुका भाजपसोबत युती करून लढविण्यासाठी आग्रही होतो. मतदारांचीही अशीच भावना होती. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत भाजपकडून कोणताही नवा किंवा सन्मानजनक प्रस्ताव देण्यात आलेला नाही. उलट भाजपने आपली आग्रही भूमिका कायम ठेवली. आमची ताकद वाढली आहे. आम्ही काहीही करू शकतो, असा अहंकार भाजपच्या भूमिकेतून दिसून येत होता.
दरम्यान, भाजपचा हा अहंकारच आज युती तुटण्याचे मुख्य कारण ठरला, असे शिरसाट यांनी ठामपणे सांगितले. युती समानतेच्या तत्वावर चालते, मात्र येथे ते तत्व पायदळी तुडवले गेल्याचा आरोपही त्यांनी केला.
शिंदेसेनेच्या आमदार पत्नीला भाजपचे तिकीट
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सुरू असलेल्या रस्सीखेच दरम्यान भाजप आणि शिंवसेनेतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला. सोमवारी रात्री मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी भाजपा १३७ जागा तर शिंदे शिवसेना ९० जागा लढवेल, अशी घोषणा केली. या घोषणेनंतर लगेचच भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली. परंतु, एका नावाने राजकीय वर्तुळात सर्वांना आश्चर्यचकित केले. भाजपने शिंदे गटातील एका विद्यमान आमदाराच्या पत्नीला तिकीट दिले आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जागावाटपाच्या सूत्रानंतर भाजपाने ज्या उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ दिले आहेत. त्यामध्ये केसरबेन पटेल यांचे नाव आहे.
वारंवार भूमिका बदलत होते
शिरसाट यांचे आरोप फेटाळून लावत भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी शिवसेना नेत्यांवर जागावाटपाबाबत त्यांची भूमिका वारंवार बदलत असल्याचा आरोप केला. सावे म्हणाले, शिवसेनेच्या नेत्यांनी अशा जागा मागितल्या होत्या, जिथे भाजप नगरसेवक सातत्याने जिंकत होते. त्यांच्याच अहंकारामुळे युती तुटली. भाजपाला अजूनही युतीमध्ये रस होता. परंतु, यासाठी शिवसेनेने एक पाऊल पुढे टाकायला हवे होते. परंतु, शेवटच्या क्षणापर्यंत तसे झाले नाही.
हेदेखील वाचा : Explainer: BMC Elections मध्ये कोणता पक्ष कोणासह? कोणाच्या विरोधात, नव्या राजकारणाने डोक्याचा होईल भुगा






