चाकणमधील वाहतूक कोंडीवर कधी तोडगा निघणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
चाकण : पुणे-नाशिक व तळेगाव-चाकण-शिक्रापूर या दोन्ही महामार्गांवरील वाढती वाहतूक कोंडी तसेच चाकण शहरासह औद्योगिक क्षेत्रातील कचऱ्याचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून ठोस उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. परतीचा पाऊस थांबल्यानंतर या दोन्ही महामार्गांच्या रुंदीकरण व सुधारणा कामांना वेग दिला जाणार असून, कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया देखील सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री पवार हे चाकण येथील एका खासगी कार्यक्रमासाठी आले असता महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, चाकणमध्ये वाढत्या वाहतुकीमुळे नागरिकांना अवघ्या दोन-पाच किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तास-दीड तास लागतो. हा त्रास नागरिकांनी आजवर खूप सहन केला आहे, याची मला जाणीव असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महामार्गांची कामे परतीचा पाऊस उघडल्यानंतर तत्काळ सुरू करण्यात येतील. निविदा प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यासाठी जात असल्याने त्यांना योग्य मोबदला मिळेल.”
कचरा व्यवस्थापनासाठी प्रक्रिया प्रकल्प उभारणार
पवार म्हणाले, “चाकण व परिसरातील गावांचा कचरा व्यवस्थापनासाठी औद्योगिक भागात प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष उपाययोजना राबविण्यात येतील. वरिष्ठ पातळीवर या संदर्भात चर्चा सुरू आहे.” यासोबतच महामार्ग विस्तार आणि रस्त्यांच्या सुधारणा कामांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ट्रान्सफॉर्मर आणि लाईट पोल शिफ्ट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहितीही पवार यांनी दिली. या पायाभूत स्थलांतरामुळे पुढील काळात रस्त्यांचे रुंदीकरण वेगाने पार पडून वाहतुकीचा प्रवाह सुलभ होण्यास मदत होणार आहे.
दौरे झाले की आणखी अडचण
दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार हे चाकण येथील एका खासगी कार्यक्रमासाठी आले असता महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पवार यांच्या ताफ्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव पुणे-नाशिक व चाकण-शिक्रापूर महामार्गावरील काही मार्गांवर पोलीसांनी अवजड वाहने रोखली होती. सकाळच्या गर्दीच्या वेळी झालेल्या या बंदोबस्तामुळे शेकडो दुचाकी, चारचाकी व मालवाहतूक ट्रक दीर्घकाळ अडकले. परिणामी नागरिकांचा प्रवास किमान अर्धा ते एक तास उशिरा झाला. रोजच्या रोज वाहतूक कोंडीमुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “दौरे झाले की आणखी अडचण होते. आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष काम व्हावे,” अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली. चाकणमधील वाहतूक कोंडी, कचरा समस्या आणि पायाभूत सुविधांवर सुरू झालेली ही प्राथमिक कामे प्रत्यक्षात किती वेगाने पूर्ण होतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.