
कदमवाकवस्ती परिसरात अडीच एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचं मोठं नुकसान
या आगीत संपत महादेव गुजर या शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. ते सुरतपट्टीलगत शेती करणारे शेतकरी आहेत. गुजर यांनी अडीच एकर क्षेत्रात ऊसाची लागवड केली होती. काही दिवसांतच ऊस तोडणीला येणार असल्याने हाच ऊस त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेचा मुख्य आधार होता. मात्र, एका क्षणात संपूर्ण पीक जळून खाक झाल्याने गुजर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.
बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गुजर यांच्या शेतातील ऊसाला अचानक आग लागली. वाऱ्यामुळे काही क्षणातच आगीने संपूर्ण शेत व्यापले. परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आणि तातडीने घटनेची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाणे व अग्निशामक दलाला दिली. माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल वैभव खोत हे घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत अडीच एकर ऊस पूर्णपणे जळून खाक झाला होता.
शासनाने नुकसानभरपाई द्यावी
ऊसाला आग नेमकी कशी लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अवघ्या २४ तासांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी ऊस जळीत झाल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही या परिसरात अशा घटना घडल्याचा दावा शेतकऱ्यांकडून केला जात असून, दोषींवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या घटनेचा त्वरित पंचनामा करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी तसेच ऊस जळीत प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी संपत गुजर यांनी केली आहे. वाढता उत्पादन खर्च, कर्जाचा बोजा आणि नैसर्गिक संकटांमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अशा घटना म्हणजे आर्थिकदृष्ट्या कंबर मोडणाऱ्या ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण
लोणी काळभोर–कदमवाकवस्ती परिसरात वारंवार घडणाऱ्या ऊस जळीत घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत तर अशा घटनांची पुनरावृत्ती थांबवणे अवघड होईल, असा इशारा स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी दिला आहे.