पुणे: सिंहगड रस्ता भागात पुन्हा एकदा ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) चे नवीन रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेने सिंहगड रस्ता भागातील एकुण ४३ आर ओ प्लांट बंद केले आहेत. या प्लांट चालकांकडून नियमावलीचे पालन न केल्याने त्यांच्याविराेधात ही कारवाई केली आहे.
सिंहगड रस्त्यावरील धायरी, किरकटवाडी, नांदोशी, नन्हे, आंबेगाव परिसरात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात जीबीएसचे रुग्ण आढळले होते. जानेवारी महीन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महीन्यात जीबीएस अाजार झालेल्या रुग्णांची संख्या घटली हाेती. या भागातील जीबीएसचा धाेका कमी झाला असतानाच, गेल्या आठवड्यात या भागात नवीन रुग्ण आढळून आल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाणी पुरवठा विभागाला पत्र पाठवून शुद्ध पाणी पुरवठा करण्यासंदर्भात कळविले हाेते.
जानेवारी महीन्यात जीबीएस आजार हा अशुद्ध पाण्यामुळे हाेत असल्याचे आढळून आले हाेते. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिकेकडून या भागातील आरओ प्रकल्पांच्या पाण्याची तपासणी केली होती. यात ३० मधील २७ प्रकल्पांचे पाणी दूषित असल्याचे समोर आल्याने हे प्रकल्प बंद केले होते. तसेच त्यांना पाणी शुद्धीकरणाची नियमावली घालून देण्यात आली होती. या नियमावलीनुसार प्लांट चालकांनी अर्ज केल्यानंतर त्याची पाहणी करून ताे सुरु करण्याची परवानगी दिली जात आहे. अात्तापर्यंत केवळ चार जणांना ही परवानगी दिली आहे.
एका आरओ प्रकल्प चालकाकडून थेट विहिरीतील पाणी शुद्ध म्हणून विकल्यानंतर एका लहान मुलाला जीबीएसची बाधा झाली होती. तो व्हेंटिलेटरवर आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिकेने गेल्या तीन दिवसांत पुन्हा पाहणी करून २१ प्रकल्प सील केले हाेते. या भागात आणखी तपासणी करून २२ आर ओ प्लांट बंद केले आहेत. एकुण ४३ आर ओ प्लांट बंद केले आहेत.
भाग निहाय बंद केलेले प्लांट पुढील प्रमाणे :
नऱ्हे गाव 21
नांदेड गाव 9
किरकटवाडी भागात 8
खडकवासला परिसर 5