
हिवाळ्यात खुलते पुण्यातील पर्यटन
सह्याद्री, संस्कृती आणि शाश्वत प्रवासाचा अनुभव
पुणे बनले राज्यातील महत्वाचे हिवाळी पर्यटन केंद्र
सुनयना सोनवणे/ पुणे: हिवाळ्याचे दिवस सुरू होताच पुणे आणि परिसरातील पर्यटन नवे रंग धारण करते. आल्हाददायक थंडी, स्वच्छ निळे आकाश आणि सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला निसर्ग यामुळे पुणे हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे हिवाळी पर्यटन केंद्र म्हणून पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. इतिहास, निसर्ग, साहस, अध्यात्म आणि आधुनिक जीवनशैली यांचा अनोखा संगम पुणे शहरात अनुभवता येतो.
किल्ले, गड आणि इतिहासाचा ठेवा
हिवाळा हा गड-किल्ले भटकंतीसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. सिंहगड, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना यांसारखे किल्ले पर्यटकांनी आणि ट्रेकर्सनी फुलून जातात. शिवकालीन इतिहास, दुर्गरचना आणि सह्याद्रीचा निसर्ग यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी हजारो युवक, महाविद्यालयीन गट आणि ट्रेकिंग संस्था या काळात मोहिमा आयोजित करतात.
निसर्ग पर्यटन आणि जलपर्यटन
पावसाळ्यानंतर हिरव्या झालेल्या डोंगररांगा, तलाव आणि धरण परिसर हिवाळ्यात अधिक खुलून दिसतात. मुळशी, पानशेत, वरसगाव, खडकवासला, भोर परिसरातील तलाव पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहेत. सूर्योदय-सूर्यास्त दर्शन, निसर्ग छायाचित्रण आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होतात. काही ठिकाणी बोटिंग आणि जलक्रीडांनाही चालना मिळाली आहे.
फिरणं तर फक्त एक कारण मूळ उद्देश तर आहे खाणं; वेगाने वाढत चाललेलं Snack Tourism नक्की आहे तरी काय?
साहसी पर्यटनाचा वाढता उत्साह
हिवाळ्यात पुणे परिसरातील साहसी पर्यटन अधिक गती घेते. कॅम्पिंग, नाईट ट्रेक, जंगल सफारी, रॅपलिंग, रॉक क्लायम्बिंग यांसारख्या उपक्रमांना मोठी मागणी आहे. मावळ, वेल्हे, भोर, मुळशी परिसरात खाजगी साहसी पर्यटन संस्थांकडून नियोजित कॅम्प्स आणि ट्रेक्स आयोजित केले जातात. थंड हवामानामुळे हे उपक्रम अधिक सुरक्षित आणि आनंददायी ठरतात.
ग्रामीण पर्यटन आणि होम स्टेचा अनुभव
हिवाळी पर्यटनात होम स्टे आणि ग्रामीण पर्यटनाचा वाटा झपाट्याने वाढत आहे. मुळशी, मावळ, भोर, वेल्हे, पुरंदर परिसरात स्थानिकांनी सुरू केलेल्या होम स्टेमुळे पर्यटकांना गावकुसातील जीवन, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि परंपरा जवळून अनुभवता येतात. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.
धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक पर्यटन
जेजुरी, नारायणपूर, देहू–आळंदी, मोरगाव, थेऊर, रांजणगाव यांसारख्या तीर्थक्षेत्रांमुळे धार्मिक पर्यटनालाही हिवाळ्यात विशेष चालना मिळते. त्याचबरोबर विद्यापीठे, संशोधन संस्था, संग्रहालये आणि ऐतिहासिक वास्तूंमुळे पुणे हे शैक्षणिक पर्यटनाचेही केंद्र ठरते.
शाश्वत पर्यटनाची गरज
पर्यटन वाढीसोबतच पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरत आहे. वनविभाग, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन जबाबदार पर्यटनाबाबत जनजागृती करत असून पर्यटकांनाही नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. योग्य नियोजन आणि सामूहिक सहभागातून पुणे पर्यटन अधिक शाश्वत आणि समृद्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जगातील 5 सर्वात सुंदर देश जे धर्तीवर स्वर्गाचा अनुभव देतात, 2026 मध्ये प्रवासासाठीचे उत्तम पर्याय
“पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, विशेषतः पुणे जिल्हा आणि परिसर युवकांना नेहमीच आकर्षित करतो. गडकोट, घाटवाटा, क्लाइंबिंग, दुर्गप्रस्तरारोहण यांसारख्या साहसी पर्यटन प्रकारांना मोठी मागणी आहे. तरुणांमध्ये नाईट कॅम्पिंगचीही विशेष क्रेझ दिसून येते. आमच्याकडे सोलो ट्रेकर्सपासून मित्रांचे गट, कॉर्पोरेट आणि कौटुंबिक सहलींसाठी लोक येतात. पर्यटनाचा खरा उद्देश आनंद घेणे हाच आहे.”
— संतोष बालगीर
(संचालक, ट्रेकवाला ॲडव्हेंचर ग्रुप)