
Pune Rain Update
सकाळपासून शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ होते. मात्र, त्यातूनही उन्हाचा चटका जाणवत होता. दुपारनंतर ढगांची दाटी वाढली आणि काही भागांत जोरदार सरी कोसळल्या. पावसामुळे काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला. शहरात सोमवारी कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १९.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
Pune Rain: जुलैत ११९ वर्षांचा विक्रम मोडला, पण ऑगस्ट कोरडा! पुण्यात सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?
किमान तापमानात काहीशी घट झाल्याने रात्रीच्या वेळी हवेत गारवा जाणवत आहे. दरम्यान, पुणे आणि परिसरात मंगळवारी (ता. २९) सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर आणि सायंकाळच्या सुमारास ढगांची दाटी वाढून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. शहरातील काही भागांत हलक्या सरी पडण्याचा अंदाज असून, कमाल तापमान ३१ अंश, तर किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दोन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सध्या विषुववृत्तीय प्रशांत महासागरात तीव्र ‘एल निनो’ स्थिती असून, मध्य आणि पूर्व भागातील समुद्रपृष्ठाचे तापमान सामान्यपेक्षा अधिक आहे. आगामी काळात ही स्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हिंदी महासागरात सध्या ‘इंडियन ओशन डायपोल’ (आयओडी) तटस्थ आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार ही स्थिती सप्टेंबरपर्यंत कायम राहू शकते. मात्र आंतरराष्ट्रीय हवामान केंद्रांच्या अंदाजानुसार सप्टेंबरपासून आयओडी सकारात्मक स्थितीकडे वळण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कमी असतानाच सप्टेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानही बहुतांश भागांत सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे.