पुणे: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुन शहर आणि उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पानी साचल्याचे पाहायला मिळाले. आज देखील पुणे शहरात आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडणे, भिंती कोसळणे अशा घटना घडल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोथरूडमधील धनंजय सोसायटी आणि पाटील इस्टेट भागातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील खराडी परिसरात सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणावर तुंबले आहे.
मुंबई, पुणे, नागपूरसह महाराष्ट्रात पावसाचा कहर
राज्यभरात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. परिणाम महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे सुमारे १० जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतेक मृत्यू वीज पडल्याने झाले आहेत. मुंबईसह महाराष्ट्राच्या बहुतेक भागात सतत पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रेल्वे रुळांपासून ते घरांपर्यंत पाणी भरल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने रत्नागिरी आणि रायगडसारख्या किनारी जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ आणि पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘भारतीय हवामान खात्याने मुंबई महानगर प्रदेशात (मुंबई शहर आणि उपनगरे) पुढील तीन तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी, बीएमसीच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाइन क्रमांक १९१६ वर संपर्क साधा.’ याचा अर्थ असा की मुंबईत काही अडचण आल्यास, बीएमसीच्या हेल्पलाइन १९१६ वर कॉल करा.