पुणे: महाराष्ट्रात मान्सनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्राला तर पावसाने अक्षरक्षाः झोडपून काढलं आहे. पुणे शहरात देखील दमदार पाऊस कोसळत आहे. मान्सून राज्यात वेळेआधीच दाखल झाला असून, येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
यामुळे पावसाळी कामाच्या नियोजनाला सुरूवात करण्यात आली असून, धरणातून करण्यात येणाऱ्या विसर्गाआधी नागरिकांना २ तास अगोदर सूचना मिळणार आहेत. विसर्ग करताना इशारा यंत्राच्या स्वरुपात भोंगा वाजवला जाणार आहे. पाणी शिरण्याचा धोका असलेल्या ठिकाणी कायमस्वरुपी ही यंत्रणा सुरू ठेवावी, त्याची माहिती पालिकेच्या नियंत्रण कक्षाने नागरिकांना द्यावी, अशी सूचना पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
यंदा मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात लवकर झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी पुण्यामध्ये जोरदार पाऊस झाला होता. यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. या पाण्यामुळे येथील नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला होता. लोकांच्या घरात पाणी शिरले होते. अनेक वाहने पाण्यात वाहून गेली होती. मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होते. यंदाचा पावसाळा अधिक असल्याने आता प्रशासन अलर्ट मोडवरून आले आहे. तशा सचूना पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत.
खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा वाढण्यास सुरूवात
मान्सूनपूर्व पावसाची गेल्या दोन दिवसांपासूनच्या दमदार हजेरीमुळे खडकवासला धरण साखळीतील चार धरणांमध्ये पाणी वाढण्यास सुरूवात झाली आहे. दरवर्षी जूनच्या मध्यापासून या धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्यास सुरूवात होते, मात्र या वर्षी २५ मेपासूनच धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली असून, २७ मेपर्यंत या चारही धरणांमधील पाणीसाठा हा ५.७४ टीएमसी इतका झाला आहे.
खडकवासला धरण साखळीतील टेमघर, पानशेत, वरसगाव व खडकवासला ही धरणे मागील वर्षी १०० टक्के भरली होती. मात्र यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात उन्हाचा कडका वाढल्याने, शहरात पाण्याची मागणी वाढली होती. परंतु, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत पहिल्यांदाच मे महिन्यातच वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
Pune News: पुणेकरांसाठी गुडन्यूज! खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा वाढण्यास सुरूवात
सोमवारी दिवसभर घाटमाथ्यासह, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली. दरवर्षी मान्सूनच्या आगमनानंतर दहा ते बारा दिवस सलग पाऊस झाला तरच जूनच्या अखेरीस पाणीसाठा वाढण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा अवकाळी पावसाने मान्सूनच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी पाणीसाठ्यात वाढ केली आहे.
एकट्या सोमवारी म्हणजे २६ मे रोजीच मान्सूनच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी या चारही धरणांमध्ये २८ एमएलडी पाण्याची वाढ झाली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. या चारही धरणांत १५० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने २६ मे पासूनच पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी सायंकाळी या चारही धरणांचा पाणीसाठा ५.६६ टीएमसी होता. तर दिवसभरात महापालिकेचा शहराचा पाणी पुरवठा तसेच कालव्यातून दिवसभर पाणी सोडण्यात आल्यानंतरही हा पाणीसाठा आज सकाळी आठपर्यंत ५.७४ टीएमसी झाला आहे.