
पुण्यात डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ; आरोग्य विभाग सतर्क
पुणे : शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण आढळू लागल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असला, तरी डास नियंत्रणासाठी धूर फवारणी सरसकट केली जाणार नाही. ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत किंवा डासांची घनता अधिक आहे, अशाच ठिकाणी आवश्यकता लक्षात घेऊन धूर फवारणी आणि जंतुनाशक फवारणी केली जाणार आहे. त्यामुळे केवळ आपल्या परिसरातही फवारणी करावी, अशी विनाकारण मागणी नागरिकांनी करू नये, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत उपाययोजना सुरू
डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने महापालिकेने सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत डास नियंत्रणाच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. निवासी भाग, बांधकामाच्या साईट्स तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणी सर्वेक्षण करून डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यावर भर देण्यात येत आहे. रुग्ण आढळलेल्या परिसरात गरजेनुसार धूर फवारणी आणि जंतुनाशक फवारणी केली जात आहे.
39 जणांचे डेंग्यू अहवाल पॉझिटीव्ह
शहरात यावर्षी आतापर्यंत संशयित डेंग्यूचे १८२ रुग्ण आढळले असून त्यापैकी ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चिकनगुनियाचे १४ रुग्ण आढळले आहेत. विशेषतः ऑगस्टमध्ये रुग्णसंख्येत वाढ झाल्याने डास नियंत्रणाच्या उपाययोजनांना वेग देण्याचे निर्देश स्थायी समितीने आरोग्य विभागाला दिले आहेत.
हॉटस्पॉट निश्चित करून…
पावसाळा संपत आला असतानाही अतिरिक्त कर्मचारी अद्याप प्रत्यक्ष कामावर उपलब्ध झालेले नसल्याबद्दल भिमाले यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णसंख्या वाढल्यानंतर मनुष्यबळाची प्रक्रिया सुरू करण्याऐवजी डास नियंत्रणाची कामे आधीच प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. हॉटस्पॉट निश्चित करून तेथील डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करावीत, तसेच सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
नागरिकांना श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता
धूर फवारणीमुळे हवा प्रदूषित होऊ शकते. त्यामुळे काही नागरिकांना श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता असते. दमट किंवा ढगाळ वातावरणात हा त्रास अधिक जाणवू शकतो. त्यामुळे रुग्ण किंवा डासांचे प्रमाण अधिक असलेल्या ठिकाणीच धूर फवारणी केली जात आहे.
– डॉ. राजेश दिघे, सहाय्यक आरोग्य अधिकारी