जय पवारांनी जागवल्या अजितदादांच्या हृदयस्पर्शी आठवणी
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ जय पवार यांनी बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये गाव भेट दौरा सुरू केला आहे. यावेळी आयोजित दौऱ्यामध्ये त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. जय पवार म्हणाले, अजित दादा कधीच थांबले नाहीत.२८ जानेवारी रोजी अपघात झाला, त्या दवशी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी चार प्रचार सभा ते घेणार होते. अपघाता वेळी कामांचीच यादी त्यांच्या हातात होती. स्वतःला बारामतीसाठी पूर्णपणे त्यांनी झोकून दिले होते. माझं लग्न झाल्यामुळे मी पुण्यात घर घेतलं होतं. दि २४ जानेवारी रोजी दिवसभर अजितदादा बारामतीत असल्याने मी त्यांना फोन करून त्यांची वेळ मागितली. त्यांनी मला २६ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता मला पुण्यातील घरी भेटण्यास सांगितले. मात्र कोणत्याही परिस्थितीत थोडा देखील उशीर करू नको, अशी सूचना देखील त्यांनी त्यावेळी केली. मी त्या दिवशी अगोदरच त्या ठिकाणी पोचलो, त्या दवशी ते खूप आनंदी होते.
मी कधीही त्यांच्याबरोबर शासकीय कार्यक्रमाला जाण्याचा आग्रह धरला नव्हता, मात्र त्यादिवशी झेंडावंदन साठी मी येऊ का असा प्रश्न केला होता, सुरुवातीला त्यांनी नकार दिला मात्र नंतर त्यांनी होकार देऊन पुढच्या रांगेत बसण्याची सूचना देखील केली. कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा पुण्यातील जिजाई बंगल्यावर ते आले. दुपारपासून त्यांच्या बैठका सुरू झाल्या. सायंकाळी पुन्हा मी त्यांना भेटलो, त्यादिवशी मला त्यांच्याबरोबर सहवासात राहण्याची खूप इच्छा झाली होती, मन कोणास ठाऊक का अस्वस्थ होत होतं, त्यामुळेच मी त्यांना भेटल्यानंतर दादा आता जरा आराम करा!, फार धावपळ करू नका, अशी विनंती त्यांना केली. त्यावेळी त्यांनी ही निवडणूक संपल्यानंतर पुढे निवडणुका नाहीत, त्यामुळे आपण पाच जण बाहेर नक्की फिरायला जाऊ, असे अभिवचन त्यांनी दिले होते, ही आठवण सांगत असताना जय पवार भावूक झाले. वडिलांची हृदयस्पर्शी आठवण जय पवार उपस्थितांना सांगत असताना उपस्थित ग्रामस्थ देखील भावुक झाले.
बारामतीच्या विकासाची गती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली कधीही कमी होऊ दिली जाणार नाही. अजितदादांच्या स्वप्नातील बारामती करण्याचा आमचा कायम प्रयत्न राहील. या निवडणुकीमध्ये विक्रमी मताधिक्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवडून द्या, प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका कायम राहील असा विश्वास जय पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दरम्यान विविध गावांमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधत असताना, त्यांनी अनेकांशी परिचय करून घेतला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर, माळेगाव या ठिकाणी प्रचार दौऱ्यामध्ये सहभाग घेऊन बैठकांमध्ये उपस्थिती दर्शवली. माजी क्रीडामंत्री संजय बनसोडे हे देखील गेल्या अनेक दिवसांपासून बारामती मध्ये प्रचारासाठी आयोजित बैठका घेत आहेत. जिल्हा सह राज्यातील विविध भागातून राष्ट्रवादीचे अनेक नेते व पदाधिकारी उत्स्फूर्तपणे बारामती मध्ये येऊन आपली उपस्थिती दर्शवत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत आहेत.






