
Lonavala Nagar Parishad Election Results 2025: NCP Ajit Pawar group wins Rajendra Sonawane as Mayor
Lonavala Nagar Parishad Election Results : वडगाव मावळ: सतिश गाडे : लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) ऐतिहासिक विजय मिळवत भाजपाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला आहे. नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजेंद्र बबनराव सोनवणे यांनी तब्बल १० हजार ६८१ मतांच्या फरकाने मोठा विजय मिळवला आहे. या विजयामुळे मागील अनेक वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात असलेल्या लोणावळा नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) नगरपरिषदेवर एकहाती सत्ता मिळवली आहे.
नगराध्यक्ष पदाचा निकाल
लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्ष आणि भाजपाच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेखा जाधव यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या आरती तिकोने यांनी ४८४ मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला. भाजपच्या सुरेखा जाधव यांना १ हजार २६ मते मिळाली आहेत.
हे देखील वाचा : पुण्यात अजित पवारांचा जलवा कायम! जिल्हायात 17 पैकी 9 राष्ट्रवादी नगराध्यक्षांनी उधळला विजयी गुलाल
तसेच तुंगार्ली गावातील चार वेळचे अपक्ष नगरसेवक राजू बच्चे यांनाही या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला असून त्या ठिकाणी मंगेश मावकर विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक ५ नांगरगाव : प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपचा विजय
प्रभाग क्रमांक ५ नांगरगाव विभागात राष्ट्रवादीचे मुकेश पारमार आणि भाजपाचे सुभाष डेनकर यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. उमेदवारी अर्जावरील आक्षेपामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती, त्यामुळे या प्रभागात प्रचार अधिक तीव्र झाला होता.
प्रचारादरम्यान पैशाचा वापर, महिलांना देवदर्शन, साड्यांचे वाटप अशा विविध आमिषांचा वापर झाल्याचे चित्र दिसून आले. मात्र मतदारांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता स्थानिक उमेदवार सुभाष डेनकर यांनाच कौल दिला.
या निवडणुकीत माजी नगरसेवक सिंधू परदेशी, संजय गायकवाड, माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांची कन्या अश्विनी जाधव, भाजप शहराध्यक्ष अनंता गायकवाड यांचे पुत्र शैलेश गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष भरत हरपुडे, माजी नगरसेविका कल्पना आखाडे, माजी नगरसेवक माणिक मराठे यांसारख्या अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
हे देखील वाचा : निवडणुकीमध्ये पैशांची गारपीट…! तेच मशीन सेटिंग अन् तोच आकडा; संजय राऊतांचा चढला पारा
राजकीय चित्र स्पष्ट
२ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला असून या निकालाने लोणावळा शहराच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला आहे. भाजपाची सत्ता गेली असून राष्ट्रवादी काँग्रेसने लोणावळा नगरपरिषदेवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे.