Maharashtra Cabinet Expansion: राज्यात सर्वाधिक मंत्रीपदे पुण्याकडेच; 'या' नवीन चेहऱ्यांना संधी, मात्र PCMC ला...
पुणे: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर रविवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. त्यात पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर आणखी ३ आमदारांना मंत्रिपद देण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक म्हणजेच ४ मंत्रीपदे पुण्याला देण्यात आली आहेत. मात्र पिंपरी चिंचवड शहराला एकही मंत्रिपद देण्यात आले नाही. शपथ देण्यात आलेल्या आमदारांना अडीच वर्षांसाठी मंत्री करण्यात आले आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे पुण्यातील इच्छुक असलेल्या आमदारांना मंत्रीपदासाठी अडीच वर्षांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पुणे शहरातून कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कॅबिनेट, पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. जिल्ह्यातून इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांची कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागली आहे. तर इच्छुकांमध्ये असणारे भोसरीचे आमदार महेश लांडगे, दौंडचे आमदार राहुल कुल, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे आणि पुणे कॅन्टोनमेंटचे आमदार सुनील कांबळे यांना अडीच वर्षानंतर मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जिल्ह्यातील २१ आमदारांपैकी फक्त वडगाव शेरीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे बापू पठारे व खेड-आळंदीतील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे बाबाजी काळे वगळता सर्व आमदार सत्ताधारी महायुतीचे आहेत. जुन्नर विधानसभेतून शरद सोनवणे अपक्ष म्हणून निवडून आलेत पण त्यांनी लगेचच शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे सत्ताधारी महायुतीचे २१ पैकी १८ आमदार जिल्ह्यात आहेत. त्यातील किमान ५ जणांना मंत्रीपदे मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तीन आमदारांना मंत्रीपदे देण्यात आली आहेत.
ज्येष्ठतेमध्ये शहरात पर्वती विधानसभेच्या आमदार माधुरी मिसाळ, कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील यांचे नाव आघाडीवर होते. तर दत्ता भरणे यांचेही नाव चर्चेत होते. त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. परंतु दौंडमधील भाजपचे राहूल कूल, भोसरीचे आमदार महेश लांडगे, कॅन्टोन्मेट चे आमदार सुनिल कांबळे, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे इच्छुक असतानाही मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या आमदारांमध्ये स्वत: अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. सत्तावाटपात अजित पवार गटाला सर्वात कमी मंत्रीपदे मिळणार आहेत. त्यामुळे ते जिल्ह्यात फार कोणाला संधी देण्यात आलेली नाही. तीच परिस्थिती शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाची आहे. त्यांचे दोन आमदार (एक अपक्ष) जिल्ह्यात आहेत. त्यातील पुरंदरचे विजय शिवतारे माजी राज्यमंत्री आहेत. त्यांना आता कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा होती. मात्र त्यांनाही मंत्रिपद सध्यातरी नाकारण्यात आले आहे.
भाजपच्या नेत्या माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आशिष जैसवाल यांनीही राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.पंकज भोयर यांनीही राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मेघना बोर्डीकर यांनीही राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली. इंद्रनील नाईक यांनीही राज्याच्या राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर योगेश कदम यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.