
पुण्यात भाजपने शतक ठाेकले, राष्ट्रवादीला धाेबीपछाड; 'हे' दिग्गज नेते पराभूत
महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडले. सुमारे ५२.४२ टक्के मतदान झाले. शुक्रवारी मतमाेजणीला सुरुवात झाल्यानंतर हळूहळू चित्र स्पष्ट हाेऊ लागले. एक हाती सत्ता येत असल्याने भाजपच्या गाेटात जल्लाेषाचे वातावरण निर्माण झाले. निकाल जाहीर हाेताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मतमाेजणी केंद्राबाहेरच गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतषबाजी केली. काही विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी हलकीच्या तालावर ठेका धरत नाचून आनंद व्यक्त केला.
मागील निवडणुकीत भाजपचे शतक हुकले हाेते. यावेळी भाजपने १२५ जागा जिंकण्याचे उद्दीष्ट ठेवत वाटचाल सुरु केली हाेती. त्यानुसार पक्षात काही इनकमिंग केले, त्यावरून भाजपमध्ये नाराजी निर्माण झाली हाेती. या नाराजीचा फटका बसेल असा अंदाज व्यक्त केला जात हाेता. परंतु, मतमाेजणीत भाजपने शतक ठाेकले.
या प्रभागात भाजपचे सर्वच उमेदवार विजयी
भाजपचे प्राबल्य असलेल्या प्रभाग क्रमांक ३६ (सहकारनगर – पद्मावती ), प्रभाग क्रमांक ३ (विमानगर -लाेहगाव ) , प्रभाग क्रमांक ८ (औंध – बाेपाेडी), प्रभाग क्रमांक १० (बावधन – भुसारी काॅलनी ) प्रभाग क्रमांक २५ ( शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई ),प्रभाग क्रमांक २७ (नवी पेठ – पर्वती ), प्रभाग क्रमांक ३४ ( नऱ्हे वडगांव बुद्रुक – धायरी ), प्रभाग क्रमांक ४० ( काेंढवा बुद्रुक – येवलेवाडी) येथे प्रभागात पॅनेलने एकतर्फी विजय मिळविला आहे.
हे दिग्गज झाले पराभूत
महापालिकेच्या सभागृहातील वरीष्ठ नगरसेवक म्हणून ओळख असलेले माजी महापाैर दत्ता धनकवडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सुभाष जगताप, माजी उपमहापाैर आबा बागुल, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम, मनसेचे शहर प्रमुख साईनाथ बाबर, शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये प्रवेश करणारे माजी गटनेते संजय भाेसले यांच्या पत्नी, माजी राज्यमंत्री यांचा मुलगा अविनाश बागवे आणि त्यांची पत्नी इंदीरा अविनाश बागवे, माजी आमदार अनिल भाेसले यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका रेश्मा भाेसले, ठाकरेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख संजय माेरे, माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकारी आणि माजी नगरसेविका रुपाली पाटील – ठाेंबरे, गुंड गजानन मारणे याच्या पत्नी आणि माजी नगरसेविका जयश्री मारणे, भाजपचे माजी नगरसेवक आदीत्य माळवे यांच्या पत्नी सायली माळवे, माजी नगरसेवक धनराज घाेगरे, माजी नगरसेविका संगिता ठाेसर, भाजपच्या माजी नगरसेविका मनिषा लडकत यांचे पती संदीप लडकत, माजी नगरसेविका अश्विनी पाेकळे यांचे पती किशाेर पाेकळे आदींना पराभवाचा धक्का बसला.
हे सुद्धा वाचा : पुण्यातील प्रभाग 33 मध्ये तुतारी वाजली; अनिता इंगळे विजयी
पक्ष बदलूनही पराभूत
भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी नगरसेवक प्रकाश ढाेरे, अर्चना मुसळे, धनंजय जाधव, शिवसेनेतून राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी नगरसेवक अशाेक हरणावळ, राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार गट) साेडून काॅंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी महापाैर प्रशांत जगताप यांच्या आई रत्नप्रभा जगताप, ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजप आणि नंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणुक लढविणाऱ्या संगिता ठाेसर आदींना मतदारांनी नाकारले आहे.
सर्वांत कमी मताने निवडुन आलेले उमेदवार पुढील प्रमाणे :