लोणी काळभोर : ‘एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ’, राजबाग, लोणी काळभोरच्या ‘मर्चंट नेव्ही शिक्षण आणि प्रशिक्षण अकादमी महाराष्ट्र’, पुणे (मॅनेट) व ‘द नॅव्हल कनेक्शन’ पुणे यांच्यामध्ये सामंज्यस्य करार (एमओयू) झाला आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरु तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड व ‘द नॅव्हल कनेक्शन’चे संस्थापक कॅप्टन शौकत मुखर्जी यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी झाली.
मॅनेट ही मर्चेंट नेव्हीसाठी शिक्षण व प्रशिक्षण देणारी भारतातील अग्रगण्य संस्था असून, तिला २२ वर्षांपासूनचा वारसा आहे. या संस्थेच्या माध्यमातून ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवले असून, मॅनेटचे ५०० हून अधिक माजी विद्यार्थी कॅप्टन, चिफ इंजिनिअर आदी अधिकारी पदांवर जगभरात कार्यरत आहेत. मॅनेटचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे २३ व्या इंडक्शन कार्यक्रमानंतर या संस्थेत सध्या १०० हून अधिक गर्ल कॅडेट शिक्षण घेत आहेत. नुकताच मॅनेटचा २३ व्या बॅचचा स्वागत समारंभ प्रा. डॉ. सुनिता कराड यांच्या अध्यक्षतेखाली तर कॅप्टन शौकत मुखर्जी यांच्या उपस्थितीत पार पडला.
तसेच यावेळी डॉ. सुदर्शन सानप, मॅनेट प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा, उपप्राचार्य प्रा. श्रीकांत गुंजाळ सर्व विभागप्रमुख व शिक्षक आदी उपस्थित होते. यावेळी, प्रा. डॉ. कराड यांनी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करताना त्यांना भावी उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या. स्वागत कार्यक्रमानंतर लगेच झालेल्या प्लेसमेंट ड्राईव्हमधून निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांचेही त्यांनी भरभरून कौतुक केले.
स्वागत समारंभातच नोकरी
मॅनेटच्या नुकत्याच पार पडलेल्या स्वागत समारंभानंतर लगेच घेण्यात आलेल्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये नवीन आलेल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी मुलाखत दिली आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यापैकी अनेकांची आत्ताच नोकरी निश्चित झाली आहे. मुलाखत देणाऱ्यांमध्ये १५ हून अधिक गर्ल कॅडेट होत्या हे विशेष. त्यामुळे स्वागत समारंभातच विद्यार्थ्यांची नोकरी निश्चित करण्याची किमया एमआयटी एडीटीने साधली आहे.