
MSRTC NCMC Card : 'ही' सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करण्याची मुभा आहे, मात्र त्यासाठी प्रवाशांना ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (MSRTC NCMC Card) घ्यावा लागतो. आता या कार्डच्या नोंदणीत पुणे विभागाने राज्यात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. पुणे विभागाने आतापर्यंत 9 लाख 26 हजार 711 प्रवाशांची नोंदणी केली असून, त्यापैकी 7 लाख 13 हजार 866 कार्डचे वितरण करण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या योजनेनुसार महिलांसह ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत दिली जाते; तसेच ७५ वर्षे पूर्ण झालेल्या महिला व पुरुषांना ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेअंतर्गत मोफत प्रवासाची सुविधा आहे.
या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एसटी महामंडळाने NCMC कार्डची नोंदणी आणि वितरण सुरू केले आहे. कार्डधारकांसाठी एक सप्टेंबरपासून कार्डचा वापर बंधनकारक करण्यात आला होता. मात्र, तांत्रिक अडचणी आणि प्रवाशांना आलेल्या समस्यांमुळे त्याच्या अंमलबजावणीला मुदतवाढ देण्यात आली आहे.
तसं पाहता, पुणे प्रदेशात पुणे, सोलापुर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या पाच विभागांचा समावेश होतो. येथे मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. तसेच पुणे प्रदेशानंतर छत्रपती संभाजीनगर प्रदेशात सुमारे 30 लाख, नाशिक प्रदेशात 27 लाख, अमरावतीत 19 लाख, नागपूरमध्ये 10 लाख आणि मुंबई विभागात सुमारे 8 लाख 72 हजार नोंदणी झाली आहे.
दरम्यान, NCMC कार्डची नोंदणी करताना आधारमधील माहिती आणि बायोमेट्रिक तपशील न जुळणे, अंगठ्याचे ठसे स्पष्ट न उमटणे, आधारला मोबाइल क्रमांक जोडलेला नसणे, ओटीपी न मिळणे, सर्व्हर व इंटरनेटच्या समस्या अशा अडचणी येत आहेत.
ग्रामीण भागातील प्रवाशांना नोंदणी केंद्रापर्यंत जाण्यासाठी करावा लागणारा प्रवास, केंद्रांवरील गर्दी आणि कार्ड मिळण्यास होणारा विलंब यामुळेही अडचणी वाढल्या आहेत.
बायोमेट्रिक पडताळणीमध्ये अडचणी येणाऱ्या प्रवाशांसाठी २१ सप्टेंबरपासून आधार ओटीपीद्वारे नोंदणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि बायोमेट्रिक ठसे जुळत नसलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
‘एनसीएमसी’ कार्डची अंमलबजावणी सुरू करताना काही प्रवाशांना मशिनवर कार्ड न चालणे, तिकीट न निघणे, घणे, रिचार्ज न होणे अशा तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे काही प्रवाशांना पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र देखील आहे.
दुसरीकडे, अंमलबजावणीला मुदतवाढ मिळाल्यानंतर एसटी महामंडळाने मशिन, सर्व्हर आणि इतर तांत्रिक यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. पुन्हा अशा अडचणी उद्भवू नयेत, यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.