सौजन्य फोटो - AI Gemini
दरम्यान, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाने केलेल्या पाहणीत लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी पातळी मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आले आहे. दिलेल्या आकडेवारीनुसार, लक्ष्मी रस्त्यावरील प्रमुख चौकांची एकूण सरासरी ध्वनी पातळी १०४.५ डेसिबल नोंदविण्यात आली. होळकर चौकात १०६.८, शेडगे विठोबा चौकात १०६.३, टिळक चौकात १०५.५, गोखले चौकात १०४.४ आणि खंडोजीबाबा चौकात १०४.२ डेसिबलची सरासरी नोंद झाली. उंबऱ्या चौकात १०४.१, बेलबाग चौकात १०४, लिंबराज महाराज चौकात १०३.५, गणपती चौकात १०३.३ आणि कुंटे चौकात १०२.८ डेसिबल ध्वनी पातळी नोंदली गेली.
पाहणीतील आकडेवारीनुसार लक्ष्मी रस्त्यावरील सरासरी ध्वनी पातळीत २०२२ ते २०२५ या काळात घट झाली होती. २०२२मध्ये १०५.२, २०२३मध्ये १०१.२, २०२४मध्ये ९४.८ आणि २०२५मध्ये ९२.६ डेसिबलची सरासरी नोंद झाली. मात्र, २०२६मध्ये ही सरासरी पुन्हा वाढून १०४.५ डेसिबल झाली आहे. तसेच शुक्रवारी दुपारी चार ते मध्यरात्रीपर्यंतच्या कालावधीतही ध्वनीची तीव्रता मोठी होती. दुपारी चार वाजता सरासरी ११३.४, रात्री आठ वाजता १११.९ आणि मध्यरात्री बारा वाजता ११२.६ डेसिबलची नोंद झाल्याचे आकडेवारीत नमूद आहे. त्यामुळे एका बाजूला पोलिसांकडून डीजेवर निर्बंध घालण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला काही मंडळांकडून नियमांना विरोध आणि मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक सुरू ठेवण्याचे प्रकार समोर आल्याने विसर्जन मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.






