पुणे: अमली पदार्थांच्या गुन्ह्यातील एका वॉन्टेड गुन्हेगाराला पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने सापळा रचून पकडले आहे. त्याच्या घरातून पोलीसांनी तब्बल सव्वाशे किलो गांजा जप्त केला असून, त्याची किंमत २५ लाख ७५ हजार रुपये आहे. ग्रामीण पोलीसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने २०२० मध्ये केलेल्या कारवाईतील तो आरोपी आहे. तेव्हापासून तो पसार होता. कैलास साहेबराव पवार (वय ३५, रा. गडदेवस्ती डोंगरगाव, लोणीकंद) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात छुप्या पद्धतीने अमली पदार्थांची विक्री सुरू आहे. यादरम्यान, अमली पदार्थविरोधी पथकाकडून माहिती काढत कारवाई केली जात आहे. यादरम्यान, अमली पदार्थांच्या गुन्ह्यातील वॉन्टेड असणारा कैलास पवारने वाडेबोल्हाई रोड गडदेवस्ती डोंगरगाव या त्याच्या घरात गांजा बाळगून ठेवला आहे. तसेच, तो घरातून गांजाची विक्री करत असल्याचे समजले. त्यानुसार, पथकाने त्याची पडताळणी केली. त्यानंतर याठिकाणी सापळा रचून छापा टाकला. त्यावेळी पवार याला पकडले. त्याच्या घराची पाहणी केल्यानंतर घरात मोठ्या प्रमाणात गांजा मिळून आला. त्याच्या घरातून २५ लाख ७५ हजार रुपयांचा १२८ किलो ७६५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तर, एक कार, रोकड व इतर ऐवज देखील जप्त केला आहे. त्याला अटककरून चौकशी करण्यात आली.
पुणे ग्रामीण पोलीसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने २०२० मध्ये यवत परिसरात काही जणांना अमली पदार्थ विक्रीत पोलीसांनी पकडले होते. त्यानंतर कैलास पवार पसार झाला होता. त्याला वॉन्टेड घोषीत करण्यात आले होते. त्यावेळी पुणे पोलीसांना माहिती मिळाली आणि त्याला पकडण्यात आले आहे. याबाबत ग्रामीण पोलीसांना कळविण्यात आले आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.