'PMPML' ला २२२ कोटी द्या; पुणे महानगर परिवहन महामंडळाची 'पीएमआरडीए'कडे मागणी; कारण काय?
पिंपरी: पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) पुणे प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत बस सेवा दिली जाते. या हद्दीत अनेक लांब पल्ल्याचे मार्ग आहेत. बस संचलनासाठी पीएमपीएलला मोठा खर्च येतो. त्यामुळे पीएमपीला संचलनापोटी २२२ कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी पीएमपीएमएलने पीएमआरडीएकडे केली होती. मात्र, तसा नव्याने प्रस्ताव दाखल झाल्यास पदसिद्ध अध्यक्ष तथा मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील, अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.
पीएमपीएमएलकडून ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत प्रवासी सेवा दिली जात आहे. २०२३ – २४ या आर्थिक वर्षात पीएमपीएलने ५०३ बसच्या मदतीने पीएमआरडीएच्या हद्दीत प्रवाशांना सार्वजनिक बस सेवा दिली होती. पीएमपीएमएल प्रशासनाला बस संचलनासाठी प्रतिदिन सुमारे एक कोटी २७ लाख रुपये खर्च आला होता. त्यापैकी प्रतिदिन ६६ लाख १८ हजार रुपये तिकिटातून उत्पन्न मिळाले. त्यामुळे पीएमआरडीएच्या हद्दीत बस संचलनासाठी प्रतिदिन ६० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचे पीएमपीएमएलचे म्हणणे आहे. वर्षाचे २२२ कोटी रुपये संचालन तूट होत आहे. ही रक्कम देण्याची मागणी पीएमपीएमएलकडून पीएमआरडीएकडे करण्यात आली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत पीएमपीकडून साधारण ३२७ मार्गांवर एक हजार सहाशे बसच्या माध्यमातून पीएमपीकडून सेवा दिली जाते. त्यापैकी पीएमआरडीएच्या हद्दीत १२२ मार्ग असून त्या ठिकाणी ५०३ बस धावतात. तत्कालीन पीएमपीएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी पीएमआरडीएच्या हद्दीतील मार्ग बंद केले होते. परंतु, पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पीएमपीएमएल अध्यक्षांची भेट घेऊन पीएमपीएमएलला पीएमआरडीएकडून संचलन तुटीचे पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी पीएमआरडीएच्या आयुक्तांना पीएमपीएमएलच्या संचालक मंडळात देखील समाविष्ट करून घेतले. परंतु, गेल्या चार महिन्यांत पीएमपीएमएलकडून कोणताही नवीन प्रस्ताव आला नसल्याचे पीएमआरडीए प्रशासनाने नमूद केले आहे. नव्याने प्रस्ताव दाखल झाल्यास प्राधिकरण समितीपुढे हा प्रस्ताव ठेवला जाईल. त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. ते यावर निर्णय घेतील, अशी भूमिका पीएमआरडीएने घेतली आहे.
पीएमपीएमएलकडून बस संचलन तुटीबाबतचा प्रस्ताव नव्याने प्राप्त झाल्यास प्राधिकरण समितीपुढे हा प्रस्ताव ठेवला जाईल. समितीचे अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल.
– योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए
हेही वाचा: पुणेकरांसाठी खुशखबर! लवकर 200 बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार
पुणे महानगर परिवहन म्हणजेच पीएमपीएलच्या ताफ्यात २०० सीएनजी बस येणार आहेत. संचालक मंडळाच्या बैठकीत टाटा कंपनीच्या बस खरेदीला मंजुरी दिली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून सीएनजी बस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु होती.
अखेर संचालकांच्या बैठकीत टाटा कंपनीच्या बस खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. कमी किंमतीत या बस मिळणार आहेत. टाटा कंपनीच्या या बसची किंमत ही ४७ लाख रुपये असणार आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत टाटा कंपनीच्या बस खरेदी करण्यासाठी अखेर मान्यता दिली आहे. आता या बस खरेदीसाठी पुणे महानगर पालिका ६० टक्के तर पिपंरी चिंचवड महानगर पालिका ४० टक्के अर्थपुरवठा करणार आहे.