
पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! (Photo Credit - X)
‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ लढतीत उतरणार
महाराष्ट्रातील महायुती, महाविकास आघाडी ही त्याचीच रुपे आहेत. पुण्यातील लढतीत ते आहेतच. शिवाय दिल्लीचे माजी मुख्य मंत्री अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित विकास आघाडी आणि खासदार ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएम हे तीन पक्ष लढतीत उतरतील.
‘आम आदमी पार्टी’चे व्हिजन आणि आक्रमक तयारी
आम आदमी पार्टीने २०१४ साली लोकसभा निवडणूक लढवली आणि पुण्याच्या राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. महापालिका निवडणुकीसाठी हा पक्ष आता पूर्ण ताकदीने उतरत आहे. या पक्षाने पुण्याच्या विकासाचे व्हिजन मांडले आहे. नागरी प्रश्न जसे की, पाणीपुरवठा, फी वाढ, पीएमपीची तिकीट दरवाढ, सिंहगड भागातील नागरी सुविधा अशा विविध विषयांवर भूमिका घेऊन आंदोलने केली आहेत. कार्यकर्त्यांची प्रशिक्षण शिबिरे घेतली आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पुण्यात येऊन कार्यकर्त्यांना शिबिरांमध्ये मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या शिबिरांना प्रतिसादही चांगला मिळाला आहे. स्वयं रोजगाराला चालना देणं, असे त्यांचे धोरण आहे. दिल्लीमध्ये शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी केलेली प्रगती, वीज बिलात दिलेली सवलत, मध्यमवर्गीयांचा सरकारमध्ये दिलेले प्राधान्य आणि मध्यममार्गी विचार, असे मुद्दे या पक्षाकडून मांडले जातात. भाजप आणि अजित पवार यांच्या युत्या, आघाड्या याविषयी निषेधाची भूमिका आम आदमी पार्टीने मांडली आहे.
‘वंचित’ची ताकद आणि आंबेडकरी विचारांचा प्रभाव
वंचित विकास आघाडीने २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. या पक्षाला मानणाऱ्या वर्गाचे अनेक पॉकेट्स पुण्यात ठिकठिकाणी आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमातून आणि उपक्रमातून वंचित विकास आघाडी कायमच कार्यरत असते. प्रकाश आंबेडकर यांचा चाहता वर्गही पुण्यात आहे. आंबेडकरी विचारांचे अनुनायी आणि पुरोगामी विचारांचे अन्य पक्षातील नेते यांच्याशी प्रकाश आंबेडकर यांचा संपर्क सतत असतो. हा पक्ष पुण्यात किती जागा लढवेल हे लवकरच स्पष्ट होईल.
‘एमआयएम’चे मुस्लिम मतांचे गणित
एमआयएम पक्षाने २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी राजकीय परिस्थिती वेगळी होती. भाजपच्या विरोधात मुस्लिम समाजाने काँग्रेस पक्षाला मते दिली होती. महापालिका निवडणुकीत मात्र काँग्रेस पक्षाला एकगठ्ठा मते मिळणार नाहीत. एमआयएम पक्षाने चांगले उमेदवार दिले तर त्यांच्या पक्षाला मते मिळू शकतील.
राजकीय विश्लेषकांनी मांडले मत
या वेळेच्या महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी खाते उघडेल अशा दृष्टीने ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महाराष्ट्रातील नगर पालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीत वंचित आघाडी आणि एमआयएम यांना अनेक ठिकाणी यश मिळाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत २०० जागा लढवू, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच केलेले आहे. मुंबई महापालिकेत एमआयएम हा पक्ष काही जागा निश्चित जिंकेल. या पक्षाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मत राजकीय विश्लेषकांनी मांडले आहे. पुण्याच्या निवडणुकीतही या तिन्ही पक्षांचा रोल काय राहील? त्याचा परिणाम अन्य पक्षांवर कसा होईल? याचे चित्र येत्या चार, पाच दिवसांतच स्पष्ट होईल.