
Pune News: Peace… Punekars are reading! Reading festival begins on December 9th
पुणे : वाचन संस्कृतीला नवे बळ देत पुण्याला ‘पुस्तकांची राजधानी’ बनवण्याच्या उद्देशाने पुणे पुस्तक महोत्सव आणि नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) यांच्या वतीने येत्या ९ डिसेंबरला ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा अनोखा उपक्रम शहरभर राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सुमारे ५ लाखांहून अधिक पुणेकर पुस्तक वाचून विश्वविक्रम प्रस्थापित करणार असून, त्यासाठी सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा : IND vs SA: T20 मालिकेसाठी भारतीय संघाच्या घोषणेचा दिवस ठरला? ‘या’ तीन स्टार खेळाडूंना मिळणार पुन्हा संधी
हा उपक्रम ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत एकाच वेळी संपूर्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राबवला जाणार आहे. विद्यार्थी, शिक्षक, सरकारी–खासगी कर्मचारी, सामाजिक संघटना, लेखक, साहित्यिक, लोकप्रतिनिधी, डॉक्टर, वकील, पत्रकार अशा सर्व स्तरातील नागरिकांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शाळा-महाविद्यालये, सार्वजनिक वाचनालये, विद्यापीठे, बसस्थानके, रेल्वेस्थानके, कार्यालये, धार्मिक स्थळे, उद्याने अशा सर्वच सार्वजनिक ठिकाणी नागरिक आपल्या आवडीच्या कोणत्याही पुस्तकाचे वाचन करून या महाउत्सवात सहभागी होणार आहेत. हा उपक्रम वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देत जगभरातून पुण्याच्या ‘पुस्तकप्रेमी शहरा’ची ओळख दृढ करण्यास हातभार लावणार आहे.
या महाअभियानासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ युवा फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीही पुणेकरांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
वाचन करतानाचा आपला फोटो https://photoupload.pbf25.in या वेबसाइटवर किंवा उपलब्ध क्यूआर कोडद्वारे अपलोड करायचा आहे. नोंदणीची सर्व माहिती आणि अद्यतने पुणे पुस्तक महोत्सवाच्या सोशल मीडिया हँडलवर उपलब्ध राहतील, असे संयोजन समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी सांगितले.
हेही वाचा : IND vs SA: विराट कोहलीच्या ‘त्या’ निर्णयामुळे BCCI अडचणीत! रोहित शर्माकडून मात्र आला होकार
पुणे पुस्तक महोत्सव हा पुणेकरांचा उत्सव झाला आहे. यंदा ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमातून विश्वविक्रम नोंदविण्याचा मान पुण्याला मिळणार आहे. वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी आणि पुण्याचे नाव जगाच्या नकाशावर ‘पुस्तकांची राजधानी’ म्हणून कोरण्यासाठी सर्वांनी आवर्जून सहभागी व्हावे.