Raju Shetti: कारागृहातील खरेदीत 500 कोटींचा घोटाळ्याचा शेट्टींचा आरोप; अमिताभ गुप्तांच्या चौकशीची केली मागणी
पुणे: राज्यातील कारागृहातील रेशन, कॅन्टीन आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीत सुमारे पाचशे काेेटी रुपयांचा घाेटाळा झाल्याचा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजु शेट्टी यांनी केला. याप्रकरणी तत्कालीन पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता अािण पाेलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चाैकशी करावी, अशी मागणी शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली.
राज्यातील काराग्रहामध्ये कैद्याच्या पालनपोषणासाठी राज्य सरकार वर्षाकाठी शेकडो कोटी रूपये खर्च करत असते. रेशन व कॅन्टीनमधून कारागृहातील कैद्यासाठी दैनंदिन लागणारे गहू, तांदूळ, साखर, डाळी, दूध, फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा, चिकन-मटण, अंडी , बेकरी पदार्थ यासारखे दैनंदिन पदार्थ खरेदी करण्यात येतात. या सर्व गाेष्टींची पुर्वी डिसेंट्रलाईज पद्धतीने खरेदी केली जात हाेती. त्यावेळी झालेल्या तक्रारीनंतर ही खरेदी सेंट्रलाईज पध्दतीने खरेदी करण्याचा निर्णय झाला. पण यावेळी माेठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार हाेत असल्याचे अभ्यास केल्यानंतर समाेर अाले अाहे, असा दावा शेट्टी यांनी केला.
एक्सपायरी संपलेला माल
खरेदीचे दर हे माेठ्या प्रमाणावर वाढविण्यात आल्याचे दिसते. मंत्रालयीन व इतर उपहारगृहांमध्ये खरेदी करण्यात येणारे साहित्य व कारागृहातील खरेदी करण्यात आलेल्या साहित्यातील दरामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. याचपध्दतीने विद्युत उपकरणांसह अन्य कारागृहात लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली जाते. या खरेदीमध्ये मोठी तफावत असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले असून यामध्ये अधिकारी यांच्या संगनमताने घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे. याबरोबरच हा माल एक्सपायरी डेट संपलेला व निकृष्ट दर्जाचा पुरवला जातो, असा अाराेप शेट्टी यांनी केला.
खरेदी दरात मोठी तफावत
कारागृहामध्ये रेशन विभागात खरेदी करण्यात आलेल्या गहू, तांदूळ, साखर, मीठ, पोहे, गुळ याच्या खरेदीमध्ये प्रतिकिलो ११ रूपयापासून ३० रूपयापर्यंत जादा दराने खरेदी केले असल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळय़ा प्रकारच्या डाळी, चहा पावडर यासारख्या वस्तूमध्ये बाजारभावापेक्षा प्रतिकिलो ११० रूपये ते २५० रूपये प्रतिकिलो जादा दराने खरेदी करण्यात आले आहेत. कारागृहामध्ये रेशन व कॅन्टीन साहित्याबरोबरच जनरेटर, वाशिंग मशिन, ड्रोन कॅमेरा, पिंटर, कुलर यामधील खरेदी दरात मोठी तफावत दिसून आली आहे, असा अाराेप शेट्टी यांनी केला.
जास्त किंमतीने फराळ खरेदी
दिवाळीमध्ये कैद्यांसाठी नावाजलेल्या कंपन्यांच्या तुलनेत जास्त किंमतीने फराळ खरेदी केला गेला अाहे. राज्यातील अनेक कारागृहात अन्न भेसळ विभागाने धाडी टाकल्या यामध्ये रेशन व उपहारगृहातील निकृष्ट दर्जाच्या मालाचे नमुने अहवाल सादर केले. तरीही यामध्ये कारागृहास माल पुरवठा करणाऱ्या ठेकेदाकडून कोणतीच सुधारणा करण्यात आली नाही. याबाबत संबधित कारागृह अप्पर पोलिस महासंचालक यांना लेखी तक्रार करून सुध्दा संबधित भ्रष्ट लोकांवर कोणतीच कारवाई झालेली नाही, असे शेट्टी यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे
एकीकडे राज्यातील तिजोरीत पैसे नाहीत तर दुसरीकडे अशी उधळपट्टी सुरु आहे. गेले तीन वर्षे ठिबक सिंचनसाठी पैसे नाहीत, विद्यर्थ्यांच्या तीन वर्षांच्या ३४०० कोटी रुपयांच्या शिष्यवृत्त्या रखडल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी लक्ष घालावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.