
आंबेगाव -शिरूरमध्ये तुतारीचा आवाज विरला! वळसे पाटलांना फक्त शिवसेनेचे आव्हान?
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष देवदत्त निकम यांना जेष्ठ नेते शरद पवार यांनी जिल्हाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिली खरी, परंतु निकम यांना स्वतःचा आंबेगाव -शिरूरचा राजकिय गड सांभाळता आला नाही. ज्या मतदारसंघात निकम यांनी दीड वर्षांपूर्वी मोठी राजकिय आघाडी घेतली होती तिथे आज पक्षाला उमेदवार शोधण्यासाठी वणवण करावी लागत आहे. निकम यांच्या घमेंडी आणि मतलबी स्वभावाचा फटका कार्यकर्त्यांना बसल्याने ज्येष्ठ नेते बाळासाहेब बाणखेले, दामू अण्णा घोडे, तालुका महिला अध्यक्षा पूजा वळसे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर आणि दादाभाऊ थोरात यांच्यासारख्या तालुक्यातील दिग्गज नेत्यांनी निकम यांना अखेरचा जय महाराष्ट्र केल्याचे सांगितले जात आहे.
आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तिकीट वाटपात तर शरदचंद्र पवार पक्षाचे पार दिवाळे निघाले आहे. आदिवासी पश्चिम भागातील शिनोली गटात ही जागा मित्र पक्षांना द्यावी लागली. घोडेगाव – पेठ गटामध्ये शरदचंद्र पवार पक्षाच्या श्रेष्ठींना उमेदवारच मिळाले नाहीत तर अवसरी – पिंपळगाव आणि कळंब – चांडोली बु. या स्वतःच्या निकमांच्या बालेकिल्ल्यात त्यांना बाहेरून उमेदवार आयात करावे लागले. ज्या शिरूर तालुक्याने निकम यांना विधानसभा निवडणुकीत तारले होते तिथे आज कोणी पक्षाचा एबी फॉर्म देखील घ्यायला तयार नाही. पाबळ आणि रांजणगाव गटात तर तुतारी पूर्णपणे गायब झाली आहे. ज्यांच्या जीवावर डॉ. अमोल कोल्हे आणि निकम यांना आघाडी मिळाली ते निष्ठावंत कार्यकर्ते आता देवदत्त निकम यांच्यापासून दूर गेल्याचे दिसून येते.
दरम्यान एकीकडे आंबेगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गटाचा अस्त होत असताना शिवसेना एकनाथ शिंदे गटाने संपूर्ण मतदारसंघात चैतन्य निर्माण केले आहे. मंचर नगरपंचायतीमध्ये शिवसेनेने मारलेली मुसंडी ही पक्षाच्या वाढत्या ताकदीची नांदी होती. आज शिवसेनेने अनेक जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य पदाच्या जागेवर सक्षम उमेदवार उभे करून आपली संघटनात्मक राजकिय ताकद सिद्ध केली आहे. माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते देखील निस्वार्थ कार्यावर विश्वास ठेवून शिवसेनेचे काम करत आहेत.
एकूणच आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदार संघाचे सध्याचे चित्र पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तीन- तेरा वाजले आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्यावर तालुक्यातील बहुतांशी महत्त्वाचे कार्यकर्ते नाराज असल्याचे देखील दिसून येते तर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी निकम यांना सोडून इतर पक्षाचा आश्रय घेतला असल्याचे प्रकर्षाने जाणवते. एकेकाळी वळसे पाटलांना तालुक्यात आव्हान देणारा नेता म्हणून देवदत्त निकम यांच्याकडे पाहिल जात होते. परंतु सध्याची तालुक्यातील राजकिय परिस्थिती पहाता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरद पवार गट ) आणि या पक्षाचे नेतृत्व करणारे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम हे पूर्णतः बॅक फुटवर गेल्याचे दिसून येत आहे.
हे सुद्धा वाचा : लोणी काळभोर गटात राजकीय रणधुमाळी; उमेदवारी अर्जानंतर निवडणूक पूर्णपणे रंगात