सौजन्य - नवराष्ट्र टीम
लोणी काळभोर जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जातीसाठी (महिला) राखीव असल्याने या जागेकडे सर्वच पक्षांचे विशेष लक्ष केंद्रित झाले आहे. या गटातून विजय मिळवणे हे केवळ स्थानिक राजकारणापुरते मर्यादित न राहता पक्षाच्या ताकदीचे प्रतीक मानले जात असल्याने प्रत्येक पक्षाने सर्वतोपरी तयारी केली आहे. त्यामुळे या गटातील निवडणूक ही केवळ उमेदवारांमधील नव्हे, तर थेट पक्षीय प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.
भाजपने या निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत लोणी काळभोर जिल्हा परिषद गटासाठी पूनम बाबुराव गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. तर लोणी काळभोर पंचायत समिती गणासाठी श्वेता कमलेश काळभोर आणि कदमवाकवस्ती पंचायत समिती गणासाठी ज्ञानेश्वर नामुगडे यांची नावे जाहीर करून भाजपने संघटनात्मक ताकद दाखवून दिली आहे. भाजपच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करताच समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे सुद्धा वाचा : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस–वंचितची अधिकृत आघाडी; भाजपविरोधात एकत्र लढणार
मतपेढी सांभाळत विजय मिळवण्यावर भर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही या गटात ताकदीची मांडणी करत लोणी काळभोर जिल्हा परिषद गटासाठी शीतल कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर लोणी काळभोर पंचायत समिती गणासाठी रेश्मा काळभोर आणि कदमवाकवस्ती पंचायत समिती गणासाठी अमोल टेकाळे यांना रिंगणात उतरवले आहे. राष्ट्रवादीकडूनही ही निवडणूक गांभीर्याने घेतली जात असून, पक्षाची पारंपरिक मतपेढी सांभाळत विजय मिळवण्यावर भर दिला जात आहे.
हे सुद्धा वाचा : राजकीय घडामोडींना वेग; शरद पवारांचा पक्ष घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार?






