
स्वाईन फ्लू, डेंग्यूसह तापाच्या रुग्णांत मोठी वाढ; पुणे, पिंपरी-चिंचवडसह उपनगरांमध्ये नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
पुणे : वातावरणातील बदल आणि पावसामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वाईन फ्लू, डेंग्यू तसेच तापाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून, ऑगस्ट महिन्यात स्वाइन फ्लूने विशेषतः वेग घेतला आहे. त्यामुळे दोन्ही महापालिकांच्या आरोग्य विभागांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पुणे महापालिकेच्या मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिटच्या अहवालानुसार, जानेवारी ते जुलै २०२६ या सात महिन्यांत शहरात अज्ञात तापाचे २१ हजार ५१२ रुग्ण आढळले. याच कालावधीत स्वाइन फ्लूचे ६५ रुग्ण होते. मात्र, ऑगस्टमध्ये एकाच महिन्यात तब्बल २०५ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे यंदा आतापर्यंत पुण्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या २७० झाली आहे. जानेवारीत स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण नव्हता. फेब्रुवारीत दोन, मार्चमध्ये शून्य, एप्रिलमध्ये पाच, मेमध्ये १०, जूनमध्ये १३ आणि जुलैमध्ये ३५ रुग्ण आढळले. पावसामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याने पुण्यात डेंग्यूचेही आतापर्यंत ९८२ रुग्ण, तर चिकुनगुनियाचे १४ रुग्ण आढळले आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्येही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागानुसार, १ जानेवारीपासून शहरात H1N1चे १९ बाधित रुग्ण आढळले असून, त्यापैकी १६ रुग्णांची नोंद ऑगस्टच्या पहिल्या १५ दिवसांत झाली. गेल्या काही वर्षांपासून नियंत्रणात असलेल्या स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सुदैवाने आतापर्यंत या आजारामुळे जीवितहानी झालेली नाही.
पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यूचेही वाढले रुग्ण
पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यूचेही रुग्ण वाढले आहेत. जुलैमध्ये १३ रुग्ण आढळले होते, तर ऑगस्टमध्ये ६२४ संशयितांपैकी २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच शहरात ३० हजारांहून अधिक थंडी-तापाचे रुग्ण नोंदविण्यात आले असून, मलेरियाचे तीन आणि चिकुनगुनियाचे दोन रुग्ण आढळले आहेत.
महापालिका आरोग्य विभागांचे आवाहन
पिपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत स्वाइन फ्लूवरील आवश्यक औषधोपचार उपलब्ध असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले. पुणे महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनीही नागरिकांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.
पावसाळ्यात डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण
पावसाळ्यात डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण निर्माण होत असल्याने किटकजन्य आजारांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत व्यापक सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जुलै महिन्यात ४ लाख ७४ हजार ५० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले.