आम्ही पुरावे दिल्यावर आयोगाने चूक मानली!; औषध निरीक्षक परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक
“राजकारण फार वंगाळ, यात शिरु नका. आम्हाला तुमच्यात उद्याचे उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तलाठी आणि ड्रग इन्स्पेक्टर दिसतात. चांगले आणि प्रामाणिक अधिकारी हवे असतील, तर ते ज्या प्रक्रियेतून तयार होतात ती प्रक्रिया पारदर्शक आणि स्वच्छ असली पाहिजे,” असे रोहित पवार म्हणाले.
MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आर्थिक आणि मानसिक संघर्षाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की,’ स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी तीन-चार तास झोप घेऊन, अनेकदा पोहे खाऊन दिवस काढत अभ्यास करतात. त्यात आता महागाईदेखील वाढली आहे, आधी तीन-चार रुपयांना मिळणारा चहा आता १० -१२ रुपये झाला आहे. दहा वर्षांपूर्वी पाच ते सात रुपये मिळणारे पोहे आता २५-३० रुपयावर गेले आहेत. तुम्ही शेतकरी कुटुंबातून येता, पेण आज शेतकऱ्यांचीच अवस्था काय आहे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ झालेली नाही. अशा परिस्थितीत आई-वडील आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे उभे करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे यश हे केवळ त्यांचेच नव्हे, तर त्यांच्या पालकांचेही स्वप्न असल्याचे पवार यांनी सांगितले.
औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटला हे सांगण्यासाठी आम्ही आयोगाला भेटलो, पुरावे सादर केले, पण सुरुवातीला आयोगाकडून पेपर फुटल्याचे नाकारले पण तपासानंतर पेपर फुटल्याचे मान्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात एफआयआर दाखल झाला असून, तपासाचा अहवाल आणि एफआयआर सार्वजनिक केला जावा, तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही रोहित पवार यांनी यावेळी केली.
शासकीय कंत्राटदारावर आत्महत्येची वेळ; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप
औषध निरीक्षकाचा पेपर ४० लाख रुपयांना विकला गेला. गर्लफ्रेंडसाठी पेपर फोडला गेला. पण या प्रकरणात केवळ एकच व्यक्ती नसून आणखी काही लोकांहीच सहभाग असाण्याची शक्यता आहे. पण यात केवळ एकाच व्यक्तीचा समावेश असू शकत नाही, पेपर नेमका किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला, त्याचा फायदा कोणाला झाला आणि या संपूर्ण प्रकरणात कोण कोण सहभागी आहे, याचा सखोल तपास झाला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, पेपरफुटी प्रकरणामुळे औषध निरीक्षक गट-ब भरती रद्द झाल्याने परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. आता या प्रकरणातील तपास कितपत पुढे जातो आणि दोषींवर कोणती कारवाई होते, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.






