पुणे: धायरी (नऱ्हे) येथील पारी चौक परिसरात दररोज होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख महेश राजाराम पोकळे यांनी वाहतूक विभागाकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, पारी चौकाजवळील MNGL कंपनीचा CNG पंप हे वाहतूक कोंडीचे मुख्य केंद्र बनले आहे. अरुंद रस्ता आणि पंपावर CNG भरण्यासाठी लागणारी वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने, परिसरातील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होतो आहे. परिणामी, शालेय वाहने, ऑफिसकर्मी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गोंधळामुळे अपघाताची शक्यता सुद्धा वाढली आहे.
– महेश पोकळे यांनी वाहतूक विभागाला तातडीने पुढाकार घेऊन खालील उपाययोजनांची विनंती केली आहे:
– पंपाजवळील वाहतूक प्रवाहाची तपासणी आणि व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा नेमणे
– वाहने रस्त्यावर उभी राहू नयेत यासाठी कठोर नियमावली आणि अंमलबजावणी
– पर्यायी मार्ग अथवा वाहनांच्या पार्किंगसाठी जागेची उपलब्धता शोधणे
– स्थानिक नागरिक व वाहतूक विभाग यांच्यात समन्वय बैठक आयोजित करणे
विशेष म्हणजे, या निवेदनासोबत नागरिकांच्या सह्यांचे समर्थनपत्र देखील जोडण्यात आले असून, यावर सिंहगड रोड वाहतूक विभागाचे ठाणे अंमलदार यांनी अधिकृत स्वाक्षरी करत निवेदन स्वीकारले आहे.
स्थानिक जनतेचा या मागणीला मोठा पाठिंबा असून, आता प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा आहे. येत्या काही दिवसांत वाहतूक सुधारण्यासाठी प्रशासन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
Pune News: बेशिस्त वाहन चालकांना लगाम कधी लागणार? वर्षभरात तब्बल ६४ हजारांवर दंडात्मक कारवाई
बेशिस्त वाहन चालकांना लगाम कधी लागणार?
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात आरटीओच्या फ्लाइंग स्क्वॉडने नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर तब्बल ६४ हजार बेशिस्त वाहन चालकावरती दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. वाहतूक नियमांचे भंग करण्यात सर्वाधिक प्रमाणात हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई झाली.
सार्वजनिक ठिकाणी नियम मोडणे आणि रस्त्यावर गोंधळ घालणे ही स्थिती अधिक धोकादायक आहे. हेल्मेट न घालणे (१९,६४५ प्रकरणे) आणि वेगमर्यादा ओलांडणे (१३,८१७ प्रकरणे) ही दोन प्रमुख कारणे अपघातांना आमंत्रण देतात. याशिवाय, अवैध विमा (८,७४४) आणि फॅन्सी नंबर प्लेट (३,५८०) यासारख्या नियमांचे उल्लंघन सर्रास होताना दिसत आहे.यात वेगमर्यादा ओलांडणे, हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न वापरणे, अवैध विमा, सिग्नल तोडणे, चुकीचे पार्किंग, जास्त भार वाहतूक, गाडी चालवताना मोबाईल वापरणे, रिफ्लेक्टरशिवाय वाहन, टेल लॅम्प/ब्रेक लाइट निकामी, तीन जण दुचाकीवर बसणे, फॅन्सी नंबर प्लेट अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.