पुण्यातील वाहनचालकांना शिस्त कधी लागणार? (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे/चंद्रकांत कांबळे: सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात आरटीओच्या फ्लाइंग स्क्वॉडने नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर तब्बल ६४ हजार बेशिस्त वाहन चालकावरती दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. वाहतूक नियमांचे भंग करण्यात सर्वाधिक प्रमाणात हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई झाली.
सार्वजनिक ठिकाणी नियम मोडणे आणि रस्त्यावर गोंधळ घालणे ही स्थिती अधिक धोकादायक आहे. हेल्मेट न घालणे (१९,६४५ प्रकरणे) आणि वेगमर्यादा ओलांडणे (१३,८१७ प्रकरणे) ही दोन प्रमुख कारणे अपघातांना आमंत्रण देतात. याशिवाय, अवैध विमा (८,७४४) आणि फॅन्सी नंबर प्लेट (३,५८०) यासारख्या नियमांचे उल्लंघन सर्रास होताना दिसत आहे.
यात वेगमर्यादा ओलांडणे, हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न वापरणे, अवैध विमा, सिग्नल तोडणे, चुकीचे पार्किंग, जास्त भार वाहतूक, गाडी चालवताना मोबाईल वापरणे, रिफ्लेक्टरशिवाय वाहन, टेल लॅम्प/ब्रेक लाइट निकामी, तीन जण दुचाकीवर बसणे, फॅन्सी नंबर प्लेट अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.शहरातील वाहतुकीचे चित्र दिवसेंदिवस धोकादायक बनत चालले आहे. वाहन चालवताना नियम मोडण्याची सवय बेशिस्त चालकांमध्ये इतकी बळकट झाली आहे की, ते आपल्या व इतरांच्या जीवाचीही पर्वा करीत नाहीत. याच्यावर पोलिस आणि आरटीओ विभाग कठोर कारवाई करत आहेत.
२०२४-२५ या आर्थिक वर्षात फ्लाइंग स्क्वॉडने नोंदवलेल्या वाहतूक गुन्ह्यांच्या नोंदी
हेल्मेट न घालणे – १९,६४५
वेगमर्यादा ओलांडणे (स्पीड गन) – १३,८१७
अवैध विमा (इनव्हॅलिड इन्शुरन्स) – ८,७४४
सीट बेल्ट न वापरणे- ५,०८७
सिग्नल तोडणे / लेन कटिंग – ३,२०४
फॅन्सी नंबर प्लेट (५०/१७७ अंतर्गत) – ३,५८०
रिफ्लेक्टरशिवाय वाहन -४,२८५
चुकीचे पार्किंग – १,७७७
गाडी चालवताना मोबाईलचा वापर२ – २४३
टेल लॅम्प / ब्रेक लाइट काम करत नसणे – १,४४४
जास्त भार असलेले मालवाहू वाहन – १,३९२
तीन जणांनी दुचाकीवर बसणे – १,४३५
वाहतूक विभागातील ‘डिओं’ना दणका; एकाचवेळी तीस पोलीस कर्मचार्यांच्या उचलबांगड्या
सार्वजनिक वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावे, नियम हे कोणावरती बंधने नसून ते आपले कर्तव्य आहे. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने जाणे या बाबी स्वतःसाठी आणि इतरांसाठीही धोकादायक आहेत. हा केवळ दंडात्मक कारवाईचा विषय नाही, तर आयुष्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. प्रत्येकाने स्वतःहून वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
–स्वप्निल भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,पुणे
वाहतूक विभागातील ‘डिओं’ना दणका
सातत्याने चर्चेत असणारा पण, काही महिन्यांपासून समाधानकारक कामगिरी करणाऱ्या वाहतूक विभागातील डिओंचा मनमानी कारभार चव्हाट्यांवर आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी डिओंना दणका देत एकाचवेळी तीसही विभागातील या ड्युटी ऑफिसर (डिओ) असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्याचे आदेश दिले. त्यानूसार एकाचवेळी ३० कर्मचाऱ्यांची लष्कर व बंडगार्डन पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. ही बदली तात्पुरती आहे. वाहतूक शाखेचा अतिरीक्त कार्यभार सांभळणारे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी रात्री याबाबतचे आदेश दिले.