"डिंभे धरणाच्या बोगद्याविषयी देवदत्त निकमांनी..."; मंचरमधून वळसे पाटलांचे थेट आवाहन
मंचर: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या राज्यभर प्रचारसभा देखील सुरू झाल्या आहेत. तसेच प्रत्येक उमेदवार हा मोठ्या जोमाने प्रचार करत आहे. “आंबेगाव तालुक्यातील डिंभे ( हुतात्मा बाबू गेणू सागर ) धरणाच्या बोगद्याविषयी महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम आपली भूमिका स्पष्ट न करता जनतेची केवळ दिशाभूल करत आहेत. बोगदा करायचा की नाही? हे सरळ सरळ सांगून निकमांनी जनतेची दिशाभूल थांबवावी. असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केले.
मंचर ( ता.आंबेगाव ) येथे पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील बोलत होते. याप्रसंगी आदिवासी नेते व माजी सभापती संजय गवारी उपस्थित होते .विवेक वळसे पाटील पुढे म्हणाले ” सध्या डिंभे धरणाच्या बोगद्या विषयीचा मुद्दा महत्वाचा बनला आहे . आता महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम व त्यांचे समर्थक सन २०१८ चे बोगद्याच्या संमतीचे पत्र दाखवत आहेत.परंतू ते पत्र धरणातील अतिरिक्त पाण्या संदर्भात दिलेले होते . परंतू धरणाच्या तळाशी पाडल्या जाणाऱ्या बोगद्याला वळसे पाटलांनी विरोध केला . त्यामुळेच शरद पवारांची साथ सोडली.
आता स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी देवदत्त निकम हे आमदार रोहित पवारांच्या ताटाखालचे मांजर बनले आहेत. आता बोगद्याविषयीची आपली भूमिका स्पष्ट न करता आंबेगाव -शिरूर जनतेचे भवितव्यच ते पणाला लावायला तयार झाले आहेत.असे सांगून विवेक वळसे पाटील म्हणाले” डिंभे धरणाच्या बोगद्या विषयीची निकमांनी आपली भूमिका सरळ सरळ भूमिका स्पष्ट करावी . यामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेचा बळी देऊ नये.वळसे पाटील हे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते.
डिंभे धरणाचे पाणी कालव्याद्वारे नगर जिल्ह्याला देण्यास वळसे पाटलांचा विरोध कधीच नाही . परंतू धरणाच्या तळाशी बोगदा पाडून ते पाणी नेण्यास निश्चित विरोध आहे . कारण पुन्हा या परिसरात दुष्काळी स्थिती निर्माण होईल.आदिवासी नेते व माजी सभापती संजय गवारी म्हणाले ” उमेदवार देवदत्त निकम हे आदिवासी जनतेच्या बाजूने एकही शब्द बोलत नाहीत. बोगद्याच्या प्रश्नाला ते गोल गोल फिरून बगल देत आहेत . आपली भूमिका स्पष्ट न करता जनतेची दिशाभूल करत आहेत . बोगदा करायचा की नाही? याचे उत्तर निकम यांनी “हो” किंवा “नाही” एवढेच द्यावे.
हेही वाचा: “मंचर शहराच्या आणखी विकासासाठी…”; पूर्वा वळसे पाटील यांचे मंचरच्या जनतेला आवाहन
दरम्यान महायुतीचे उमेदवार आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांच्यावर टीका केली आहे. आमदारकी डोळ्यासमोर ठेवूनच ते माझ्यासोबत फिरत होते अशी टीका त्यांनी केली आहे.“आपण मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत देवदत्त निकम यांना सभापतीपद देऊन चुक केली . त्यांन तेथे मनमानी कारभार केला . व्यापाऱ्यांचा रोष ओढून घेतला . धना मेथीचा बाजार बंद पाडला. केवळ आमदारकी डोळ्यासमोर ठेवूनच ते माझ्यासोबत तालुका फिरले . ” अशी टीका सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांच्यावर केली.