'Pink E Rickshaw' : दहा हजार महिलांना मिळणार 'पिंक ई-रिक्षा'; 'या' शहरांत राबवली जाणार योजना
पुणे: महिलांंच्या रोजगारनिर्मितीस चालना मिळावी, तसेच त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी ‘पिंक ई-रिक्षा’ योजना आखण्यात आली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात १७ शहरांंतल्या १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना केवळ १० टक्के रक्कम भरावी लागणार असून, २० टक्के अर्थसहाय्य राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे. बँकेकडून ७० टक्के रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर अग्रणी बँकांची यादी तयार करण्यात आली आहे. या बँकांसोबत करार करण्यात आले आहेत.
महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘पिंक ई-रिक्षा’ योजनेसाठी प्रतिसाद वाढला असून, आतापर्यंत ३२५५ महिलांंनी अर्ज केले आहेत. त्यांपैकी ७४४ महिलांंचे अर्ज मंंजूर झाले असून, नवीन वर्षात गुलाबी रिक्षा रस्त्यांंवर धावणार आहेत.
महिला व बालविकास विभागाने ही योजना जाहीर केली असून, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काम रखडले होते. आता पुन्हा अर्जनोंदणी आणि छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या आठ जिल्ह्यांंतून ३२५५ महिलांनी अर्ज केले आहेत. त्यांपैकी ७४४ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित अर्जांची छाननी सुरू आहे. महिनाअखेर अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने नवीन वर्षापासून गुलाबी रिक्षा रस्त्यावर धावू शकणार आहेत.
आतापर्यंत शासनाकडे आलेले अर्ज
आतापर्यंत पुणे, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, नागपूर आणि अमरावती या आठ जिल्ह्यांत प्राथमिक स्तरावर ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यांपैकी सर्वाधिक ९६८ अर्ज नागपूर जिल्ह्यातून प्राप्त झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ५६०, पुणे जिल्ह्यातून ३३१, कोल्हापूरमधून ११८, सोलापूर येथून २८५, नाशिकमधून ५३०, अहिल्यानगरमधून ३१६, अमरावती जिल्ह्यातून १४७ असे ३२५५ अर्ज दाखल झाले आहेत.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार ‘पिंक ई-रिक्षा’ योजना १७ जिल्ह्यांंत राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. १० हजार महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ३२५५ अर्ज आले आहेत. अर्जांची संख्या वाढल्यास लाॅटरी पद्धतीचा अवलंब करून लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. नवीन वर्षात गुलाबी ई-रिक्षा रस्त्यावर धावू शकणार आहेत.
– प्रशांत नारनवरे,
आयुक्त, महिला व बालविकास विभाग
नव्याने पाच हजार 667 रिक्षाचालकांना परवाने वाटप
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर आणखी मोठ्या प्रमाणावर रिक्षा धावणार असून ‘आरटीओ’कडून आठ महिन्यांत 5 हजार 667 रिक्षाचालकांना परमीटचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराचे साधन प्राप्त होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली आहे. मात्र आहे त्या रिक्षा चालकांचा व्यवसाय होत नसल्याचे सांगत यास अनेक रिक्षा संघटनेने विरोध केला आहे. चौकाचौकात चालकांनी रिक्षा स्टँड उभारले आहेत. ठरवून दिलेल्या जागेतच या रिक्षा थांबतात. ठरविलेल्या मार्गात सेवा देतात. मात्र, खासगी अॅपवर धावणार्या रिक्षांचा कुठलाच थांबा नसतो.