पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर आणखी मोठ्या प्रमाणावर रिक्षा धावणार असून ‘आरटीओ’कडून आठ महिन्यांत 5 हजार 667 रिक्षाचालकांना परमीटचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराचे साधन प्राप्त होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली आहे. मात्र आहे त्या रिक्षा चालकांचा व्यवसाय होत नसल्याचे सांगत यास अनेक रिक्षा संघटनेने विरोध केला आहे.
चौकाचौकात चालकांनी रिक्षा स्टँड उभारले आहेत. ठरवून दिलेल्या जागेतच या रिक्षा थांबतात. ठरविलेल्या मार्गात सेवा देतात. मात्र, खासगी अॅपवर धावणार्या रिक्षांचा कुठलाच थांबा नसतो. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी या रिक्षा पार्क केल्या जातात. परिणामी बर्याचदा वाहतुकीची समस्या उद्भवत आहे. पर्यायाने, शहरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोर जावे लागत आहे. त्यावर तोडगा आवश्यक आहे. मात्र परमीटचे वाटप आरटीओकडून अद्यापही सुरूच आहे.
शहरातील नागरिक खासगी वाहनांचा ज्या प्रमाणात वापर करीत आहेत, त्याहून अधिक संख्येने सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब करणारे नागरिक आहेत. सार्वजनिक वाहनांमध्ये महापालिकेच्या बस, ओला, उबेर आणि रिक्षा आदी वाहनांचा समावेश होतो. शहरात सार्वाजनिक वाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने रिक्षांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. 2017 पासून रिक्षा परवाना वाटप खुला करण्यात आल्याने मागेल त्याला अटींची पूर्तता करून परमीट दिले जात आहे.
मेट्रोद्वारे नागरिकांना सक्षम सार्वजनिक सेवा मिळत आहे. त्यामुळे बर्याच रिक्षाचालकांचा दिवस भरणे देखील अवघड होऊन बसले आहे. रिक्षाच्या कर्जाचे हप्तेही थकले आहेत. त्यामध्ये आरटीओकडून परमीट वाटप सुरू असल्याने शहरातील रिक्षांमध्ये आणखी भर पडत आहे. त्यामुळे रिक्षांचे परमीट थांबवावे, अशी मागणी अनेक संघटनांकडून होत आहे.
रिक्षाचालकांना परमीटचे वाटप (वर्ष 2023)
जानेवारी : 422
फेब्रुवारी : 590
मार्च : 547
एप्रिल : 437
मे : 1009
जून : 1004
जुलै : 990
ऑगस्ट : 668
एकूण : 5667
रिक्षांचे वाढते प्रमाण शहरासाठी धोकेदायक : बाबा कांबळे
2017 सली महाराष्ट्र सरकारने मुक्त रिक्षा परवाना सुरू केला यामुळे पिंपरी चिंचवड पुणे व आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिक्षा विकल्या जात आहेत. यामध्ये महिन्याला हजार रिक्षा नव्याने शहरांमध्ये येत आहेत. पूर्वी पिंपरी चिंचवड शहरामध्येपाच हजार रिक्षा होत्या. आता पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा ची संख्या 35000 पर्यंत पोहोचली आहे, एवढ्या मोठ्या संख्येने वाढणाऱ्या रिक्षाचं प्रमाण पाहता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गैरसोईचे असून, रिक्षा चालकांचा व्यवसाय देखील यामुळे एका भाकरी मध्ये अनेक वाटेकरी होत आहेत. रिक्षा व्यवसाय देखील अडचणीमध्ये आला आहे. या सर्व प्रश्नांवरती सरकारने तातडीने लक्ष देऊन मुक्तरिक्षा परवाना बंद करावा. तसेच नवीन इलेक्ट्रिक रिक्षाला परवानगी सक्ती करावी, अन्यथा स्मार्ट सिटी मेट्रो सिटी मध्ये सर्वत्र रिक्षा रिक्षा दिसतील. प्रवासी कमी आणि रिक्षा जास्त अशा प्रकारे भयानक अवस्था निर्माण होईल, ही परिस्थिती थांबवण्यासाठी सरकारने तातडीने उपयोजना करावी, अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले आहे.