पुरंदरच्या वाड्या-वस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य! 'इमर्जन्सी' लोडशेडिंगमुळे टॉर्चच्या उजेडात अभ्यास करण्याची वेळ
Purandar Load Shedding: पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागात मागील आठवड्यापासून कृषी पंपांच्या फिडरसाठी सुरू असलेल्या ‘इमर्जन्सी’ लोडशेडिंगचा मोठा फटका वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना बसत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा गंभीर परिणाम होत आहे. अनेक वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी रात्री टॉर्चच्या उजेडात अभ्यास करताना दिसत असून, त्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. Power Crisis in Purandar: Emergency Load Shedding Disrupts Rural Life & Student Studies
पुरंदर तालुक्यातील अनेक वाड्या-वस्त्या डोंगराळ तसेच बागायती क्षेत्रात आहेत. या परिसरात मागील काही वर्षांपासून बिबट्याचा वावर वाढला असून, रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याचा वावर वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यातच सर्पदंशाचा धोका आणि चोरीच्या घटनांमुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही ग्रामस्थांसाठी धोकादायक ठरत आहे.
वाल्हे, जेऊर, मांडकी, हरणी, पिंगोरी, पिसुर्टी, सुकलवाडी, वागदरवाडी तसेच नीरा परिसरातील विविध ग्रामपंचायतींच्या हद्दीतील वाड्या-वस्त्यांना कृषी पंपांच्या फिडरवरून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे कृषी पंपांसाठी ‘इमर्जन्सी’ लोडशेडिंग करण्यात येत असताना त्याचा परिणाम शेतातील लोकवस्तीवरही होत आहे. रात्रीच्या वेळी घरांमध्ये उजेड नसल्याने वृद्ध, महिला आणि लहान मुलांनामोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. उकाडा आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, पावसाने काही दिवसांपासून दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर उभी पिके वाचविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखे कडक ऊन पडत असल्याने शेतातील पिकांना पाण्याची गरज भासत आहे. मात्र, शेतीपंपांसाठी वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. बिबट्याची दहशत असतानाही शेतकरी जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच वीजपुरवठ्याच्या अनिश्चिततेमुळे उभी पिके करपण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन कृषी पंपांच्या फिडरवर लोडशेडिंग करताना गावठाण तसेच वाड्या-वस्त्यांवरील घरगुती वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरळीत ठेवून ग्रामीण भागातील नागरिकांची सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.






