अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये १५ ऑक्टोबर रोजी रविवारी अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत भोईआळी समोर सिद्धिविनायक वास्तुचे पत्रे वादळी वाऱ्यात दूरवर फेकले गेले. तर काही घरांवरील पत्रे देखील उडाले. इमारतीवरील पत्रे भातशेतीत उडाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.
सुदैवाने हे पत्रे मोकळ्या जागेत कोसळले, त्यामुळे जीवित हानी झाली नाही. मात्र पत्रे तुटून मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे टेन्शन वाढलं आहे. दरम्यान ऐन नवरात्रीच्या सणात आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची देखील गाळण उडाली.