पेण/संतोष पेरणे : तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिकणारी विद्यार्थिनी खुशबू ठाकरे हिचा २२ जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. खुशबूला न्याय देण्यासाठी आणि दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी पेणमध्ये १६ जुलै पासून तहसील कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.आदिवासी विद्यार्थिनी खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची प्रमुख मागणी आहे.
पेण तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत चालविल्या जात असलेल्या वरवणे येथील आदिवासी आश्रम शाळेत खुशबू ठाकरे या आदिवासी विद्यार्थिनीचा कुष्ठरोगावरील उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेला सहा महिने उलटूनही खुशबू ठाकरे प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आला नाही.आरोग्य विभागाचा चौकशी अहवाल आणि केमिकल एनलाइस रिपोर्ट सार्वजनिक करणेबाबत तथा रिपोर्टची वाट न पाहता तत्काळ दोषींवर गुन्हा दाखल करणे. या आणि इतर मागण्यांसाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली १६/७/२०२५ पासून तहसिलदार पेण यांचे कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.
त्याबाबत पेण तहसीलदार तानाजी शेजाळ आणि खुशबू ठाकरे प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्याक पोलिस निरिक्षक नवरखेड यांना देण्यात आले आहे.यावेळी खुशबू ठाकरेचे वडील नामदेव ठाकरे,सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर,ग्राम संवर्धन समिती तांबडी सदस्य नरेश कडू,पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेचे सी आर म्हात्रे सर, राजीव गांधी पंचायतीराज संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव नंदा म्हात्रे,महिला फेडरेशनच्या मोहिनी गोरे,सत्यशोधक चळवळचे संदिप पाटील गागोदे,आचार्य विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठानच्या संगीताताई व वंदना जाधव आदी उपस्थित होते. खुशबूच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर लवकरात लवकर गुन्हे नोंद होऊन एका आदिवासी कन्येला न्याय देण्याच्या प्रक्रियेत आदिवासी समाजासह इतर समाजातील सर्व घटकांतील नागरिकांनी, राजकीय तथा सामाजिक संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ठिय्या आंदोलनातील प्रमुख मागण्या
१) खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूची चौकशीचा अहवाल पोलिसांना सादर करण्यात यावा तो सार्वजनिक करावा.
२) खुशबू ठाकरे हिचा केमिकल ऐनालाइस रिपोर्ट पोलिसांना द्यावा तो सार्वजनिक करावा.
३) सदरचे दोन्ही अहवाल सादर १६जुलै २०२५ पूर्वी सादर न झाल्यास सदर अहवालाची वाट न पाहता खुशबूच्या पालकांच्या व सामाजिक संघटनांच्या तक्रारी निवेदनाच्या आधारावर . दोषींवर गुन्हादाखल करण्यात यावा व निवेदनात नमूद दोषींची चौकशी तपास करून पुरावे गोळा करून न्यायालयात चार्जशीट सादर करण्यात यावी.
४)आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने जि आरोग्य अधिकारी श्रीमती विखे यांचा कोणताही जबाब चौकशीत ग्राह्य धरू नये व अशा बेजबाबदार व अधिकारांचा गैरवापर करणारृया जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सदर पदावरून तत्काळ कार्यमुक्त करावे व त्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा.
५) खूशबू ठाकरे हिच्या पालकांना १० लाख नुकसान भरपाई देण्यात यावी.
६) आदिवासी आश्रमशाळेतील विद्यिर्थ्यांच्या आरोग्याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा.याबाबत ह्यापूर्वी महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी लावून धरला होता ३० जुलै पर्यंत महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्याने पुन्हा हा प्रश्न सभागृहात चर्चेला येणार व सरकार त्यावर काय भुमिका घेणार ह्याकडे सर्व आदिवासी बांधवांचे व पेणच्या तालुक्याचे लक्ष लागू आहे.