
Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
कुडुस ग्रामपंचायतीच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात उपस्थित होते. तक्रारीनुसार, सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास ग्रामविकास अधिकारी मिलिंद सावंत यांनी राष्ट्रध्वज फडकविताना तो उलटा फडकविल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. (फोटो सौजन्य – AI Created)
राष्ट्रध्वज उलटा फडकविल्याने उपस्थित नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली. त्यानंतर संबंधितांनी ध्वज सरळ करून पुन्हा फडकविला. मात्र, राष्ट्रध्वजाचा झालेला कथित अवमान गंभीर असून तो केवळ ध्वज सरळ करून भरून निघणारा नसल्याचे ग्रामस्थांनी तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेप्रकरणी कुडुस ग्रामपंचायतीतील नागरिकांनी एकत्रितपणे पोयनाड पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. तक्रारीवर अनंत सोमा पाटील, दिलीप रामदास मिसाळ, अंकलेश्वर नामदेव पाटील, नरेश जनार्दन ठाकूर, मनोहर मोरेश्वर पाटील, राजेंद्र गणपत पिंपळे, संजय शंकर पाटील आणि सौरभ अनंत पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तक्रारीची प्रत जिल्हाधिकारी, रायगड यांनाही देण्यात आली आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज फडकविताना आवश्यक ती दक्षता घेणे अपेक्षित असताना अशा प्रकारची घटना घडल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान हा अत्यंत गंभीर विषय असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी आणि गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारदार ग्रामस्थांनी केली आहे.
मुंबईतील 99 हजार फेरीवाल्यांना मिळणार QR कोड ओळखपत्र; पालिकेच्या निर्णयावर विरोधकांचा सवाल
दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार असून, तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुडुस ग्रामपंचायतीतील या प्रकाराकडे प्रशासन आणि पोलिस यंत्रणा कोणती भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. गावात सुव्यवस्थेचे वातावरण राहावे यासाठी पोलिस प्रशासनाकडून पाऊले उचलण्याची मागणी होत आहे.