
संंतोष पेरणे: माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना चुकीची माहिती देऊन त्यांची फसवणूक केली जात आहे. त्याबद्दल माथेरान पर्यटन बचाव समितीकडून 18मार्च पासून माथेरान बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.दरम्यान,प्रशासनाने त्याबाबत अनेक बैठका संबंधितांबरोबर घेतल्या असून सोमवार 17मार्च रोजी अंतिम बैठक होणार असून त्यात सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे,मात्र सकारात्मक निर्णय झाला नाहीतर 18 मार्च पासून माथेरान बंद ठेवले जाणार आहे.
माथेरान पर्यटन बचाव समिती यांच्याकडून विविध 17मुद्दे निश्चित करण्यात आले होते आणि त्यात सुधारणा करण्याची मागणी प्रशासनाला केली होती.त्यातील नेरळ माथेरान टॅक्सी बाबतचा मुद्दा दोन्ही संस्थानी एकत्र बसून निर्णय घेतल्यावर मागे घेण्यात आला आहे. दस्तूरी ते माथेरान स्टेशन या दरम्यान आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून रोजगार करणाऱ्या आदिवासी लोकांना त्यातून वगळण्यात आले आहे.माथेरान बचाव समितीकडून प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर प्रशासनाने माथेरान बचाव समितीबरोबर मागील आठवड्यात अधीक्षक कार्यालय येथे झालेल्या बैठकीत चर्चा केली होती. त्याचबरोबर पोलीसांनी घोडे चालविणारे, मालवाहू घोडे चालक यांच्याशी चर्चा केली आहे.माथेरान पर्यटन बचाव समितीने 18मार्च ही तारीख माथेरान बेमुदत बंद ठेवण्यासाठी निश्चित केली आहे.त्यावर प्रशासनाने माथेरान मधील पर्यटकांची फसवणूक होऊ नये आणि येथील पर्यटन वाचावे यासाठी जोरदार शासनाच्या यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत.आता येत्या सोमवारी अंतिम बैठक प्रशासनाच्या पातळीवर होणार आहे.त्यावेळी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा असून त्यावेळी निर्णय न झाल्यास 18मार्च मंगळवार पासून माथेरान बंदला सुरुवात होणार आहे.
या विषयावर माथेरान मध्ये येणाऱ्या पर्यटकांची फसवणूक होत असल्याचा माथेरान पर्यटन बचाव समितीचा दावा आहे.
1)सुट्टीच्या दिवशी व शनिवार रविवारी घाटपायथ्याला वाहतूक कोंडी होऊ नये याकरीता पोलीस बंदोबस्त ठेवावा.
2) घाटाच्या सुरुवातीला ओला, उबर,परमिट टुरिस्ट वाहने यांना बंदी असल्याचा फलक लावला आहे तो तात्काळ हटवावा.
3) अश्वचालकांस पर्यटकांबरोबर वाहनतळ परिसरात संपर्क साधण्यास सक्त मज्जाव करावा. वाहनतळ परिसराबाहेर सर्व अश्वचालकांनी घोडे पार्कींगजवळ थांबवावेत.
4) दस्तुरी नाका येथे पर्यटकांसाठी माहीती आणि सुविधा केंद्र तातडीने चालु करावे
5) नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे दस्तुरीवरुन प्रिपेड अश्वसेवा सुरु करावी.
6) माथेरान दस्तुरी नाक्यावर कायम पोलिस बंदोबस्त ठेवणे.
7) नगरपरिषद व वनखाते यांनी पर्यटक एकाच द्वाराने माथेरान शहरातत प्रवेश करतील अशी व्यवस्था तातडीने लागू करावी.
8) नगरपरिषद व वनखात्याने वाहनतळ परिसरात व घोडा स्टँड पर्यंत जास्तीत जास्त माहीती फलक, घोडे, रिक्षा, कुली यांचे दरफलक निश्चित करून डिस्प्ले स्वरूपात लावावेत.
9) नगरपरिषद आणि वनखाते हे पर्यटकांकडून वाहनतळ शुल्क आकारतात. त्यांनी त्यांचे कर्मचारी वाहनतळ परिसरात पर्यटकांना माहीती व मदत करण्यासाठी अधिकृतपणे नियुक्त करावेत.
10) अश्वपाल संघटनेने वाहनतळात उभारलेला दरफलकामुळे फसवणुकीला कारणं पाठींबा मिळतो त्यामुळे सदर फलक त्वरीत हटवावेत.
11) वाहनतळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत ते त्वरीत चालु करावेत आणि कॅमेरे यांची संख्या वाढवावी.
12) दस्तुरी नाका ते अमन लॉज या संपूर्ण परिसरात ई रिक्षा, शटल सेवा, मिनी बस यांचे वेळापत्रक दर्शवणारे फलक, प्रेक्षणीय स्थळांबाबत माहिती दर्शविणारे फलक तसेच अश्वचालक आणि कुली यांचे दर दर्शविणारे फलक लावण्याची व्यवस्था करावी.
13) नगरपरिषदेच्या प्रवासी कराची पावती फक्त आणि फक्त पर्यटक यांनाच द्यावी अश्वचालक, कुली, एजंट यांना नो पार्किंग झोनमध्ये प्रवेश देण्यात येवू नये.
14) शनिवार रविवार तसेच ऐन गर्दीच्या वेळेत (जीवनावश्यक वस्तू वगळता) मालवाहतूक अश्वांना दस्तुरी ते बाजार पेठ दरम्यान बंद ठेवावेत.
15) संपूर्ण दस्तुरी नाका परिसरातील बेकायदेशीर अश्वांचे तबेले हटविल्यास वाढीव पार्किंगची व्यवस्था होण्यास मदत होऊ शकते तसेच संपूर्ण परिसर स्वच्छता व्हावी.