अलिबागमध्ये कामगार न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या हस्ते उद्घाटन
भारत रांजणकर/अलिबाग:रायगड जिल्ह्यातील कामगार वर्गासाठी ऐतिहासिक ठरणारा क्षण आज शनिवारी उजाडला. अलिबाग येथे नव्याने उभारण्यात आलेल्या कामगार न्यायालय रायगड-अलिबाग या न्यायालयाचे भव्य उद्घाटन न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले.
न्यायालयीन व्यवस्थेचे विकेंद्रीकरण हे न्यायप्रविष्टतेच्या दिशेने एक महत्त्वाचे आणि दूरगामी पाऊल आहे. कामगार वर्गाच्या हक्कांचे रक्षण आणि औद्योगिक शांततेच्या दृष्टीने अशा न्यायालयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी केले.
MHADA lottery: म्हाडा कोकण मंडळाची सोडत संपन्न; एकनाथ शिंदे म्हणाले, ” ज्यांना घराची लॉटरी लागली…”
हा सोहळा कामगार न्यायालय, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योग न्यायालय महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष विजयकुमार प्रसाद पाटकर होते. या प्रसंगी रायगड जिल्हा लेबर कोर्ट प्रॅक्टिसनर्स बार असोसिएशन महाडचे अध्यक्ष ॲड. विजय मेहता, रायगड जिल्हा व अलिबाग वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील, तसेच कामगार न्यायाधीश जी. एस. हांगे यांची उपस्थिती लाभली.
या न्यायालयाच्या स्थापनेमुळे रायगड जिल्ह्यातील कामगार आणि औद्योगिक वादांच्या सोडवणुकीसाठी स्थानिक पातळीवरच न्याय मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. आतापर्यंत कामगारांना आपली प्रकरणे मांडण्यासाठी मुंबई किंवा इतर ठिकाणी जावे लागत होते. मात्र आता अलिबागमध्येच न्याय मिळणार असल्याने वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठी बचत होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील उद्योग आणि कामगारांसाठी हे न्यायालय एक वरदान ठरणार असून, वादांचे जलद आणि न्याय्य निराकरण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. न्यायप्रविष्टतेचा अधिकार हा प्रत्येक कामगाराचा मूलभूत हक्क असून, न्यायालयीन सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या नव्या न्यायालयाच्या उद्घाटनामुळे रायगड जिल्ह्यातील न्यायप्रणाली अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि कामगारहितैषी होणार असून, कामगार न्यायासाठीच्या प्रयत्नांना नवे बळ मिळाले आहे.