म्हाडाच्या कोकण बोर्डाची सोडत जाहीर (फोटो- ट्विटर)
ठाणे: ठाणे येथील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण मंडळ सोडत २०२५ अंतर्गत ५ हजार ३५४ सदनिका आणि ७७ भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत संपन्न झाली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर, म्हाडाचे इतर अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, म्हाडाच्या कोकण विभागाची जवळपास 5 हजार 354 घरांची सोडत आज संपन्न झाली. आज सगळ्यांच्याच दृष्टीने आनंदाचा दिवस आहे. सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचा स्वप्नपूर्तीचा आजचा दिवस आहे. प्रत्येकाचं घर हे स्वप्न असते आणि त्याची पूर्तता आज करण्याचा दिवस आहे. ज्यांना घराची लॉटरी लागली आहे त्यांची दिवाळी नवीन घरात होईल, गोड होईल आणि ज्यांना लॉटरी नाही लागली त्यांनीही निराश होवू नये. एक इमारत किंवा घर म्हणजे चार भिंतीच घर किंवा एक इमारत एवढ्या पुरतं ते मर्यादित नसून घर हे प्रत्येकाच्या आयुष्यातले एक मोठे स्वप्न असते आणि त्यामध्ये कुटुंबाच्या सुरक्षिततेचा, आत्म सन्मानाचा आणि सुख समृद्धीचा पाया हे घर आहे आणि म्हणूनच घराचं स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडाचं मी मनापासून अभिनंदन करतो.
आज 5 हजार 354 घरे आणि 77 भूखंडांसाठी संगणकीय अतिशय पारदर्शक पद्धतीने लॉटरी काढण्यात आली आहे. अशा पारदर्शक कार्यपद्धतीमुळे म्हाडावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. मगाशी मला संजीव जयस्वाल म्हणाले की, 5 हजार 354 घरांसाठी 1 लाख 84 हजार 994 अर्ज प्राप्त झाले आहेत. यावरून निश्चितपणे लक्षात येतं की म्हाडावर आणि त्याच्या घरांच्या क्वालिटीवर आणि किमतींवर सर्वसामान्य लोकांचा आता विश्वास वाढत चाललेला आहे. आता म्हाडाची घरं उत्तम दर्जाची आणि वेळेमध्ये पूर्ण होत आहेत. त्यामुळे एक विश्वासाचं नातं निर्माण करण्याचं काम म्हाडाने केलेलं आहे. परवडणारे घर देणारे कुठले प्राधिकरण तर म्हाडा हे नाव आपण घेतो आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने म्हाडा केवळ एक गृहनिर्माण संस्था नाहीये तर सर्वसामान्यांचे आयुष्यामध्ये आनंद निर्माण करणारी विश्वासाची शिदोरी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाच्या सुरक्षिततेचा, आत्मसन्मानाचा आणि आनंदाचा पाया आहे. सर्वसामान्यांना परवडणारी घरे देण्याचे काम म्हाडा पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने करत आहे. आता म्हाडाची घरे उत्कृष्ट दर्जाची, वेळेत पूर्ण होणारी आणि सर्वसामान्यांच्या… https://t.co/bXoVVaFfpV pic.twitter.com/gHMwaZJ2KK — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 11, 2025
आता जीएसटीच्या माध्यमातून देखील घरांच्या किमतीमध्ये फरक पडलेला दिसेल आणि मोदी साहेबांनी जीएसटीचे दोन स्लॅब काढून टाकले असून जीवनावश्यक वस्तूंना त्यामध्ये फायदा झाला, यामध्ये घर घेणाऱ्यांनाही फायदा होईल, नोकरदार वर्गाला देखील त्याचा फायदा होतोय आणि जे छोटे-मोठे व्यापारी, दुकानदार त्यांनाही त्याचा फायदा होतो. ज्येष्ठांसाठी देखील आपण पॉलिसी केलेली आहे आणि ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असून त्यांच्या आशीर्वादाने आपण हे सर्व काम करत असतो,असे एकनाथ शिंदे म्हणाले.