शिवरायांच्या सिंहासनारूढ मूर्तीची होणार स्थापना; नेरूळमध्ये अवतरली शिवशाही
नवी मुंबई/सिद्धेश प्रधान -: नेरूळ सेक्टर 1 शिरवणे येथील राजीव गांधी उड्डाणपूल येथे असलेल्या चौकात महाराजांची सिंहासनरूढ मूर्तीची स्थापना लवकरच होणार आहे. हातात भाला घेतलेले मावळे, तोफा, अंबारी असे इतिहासाचे स्वरूप या चौकाला प्राप्त झाले आहे. जणू काही चौकात शिवशाही अवतरली आहे. गेले अनेक दिवस चौकाला रंगरंगोटी सुरू होती. अखेर ज्या क्षणाची नेरुळकर वाट पाहत होते. तो क्षण आला असून त्या क्षणासाठी नेरूळ शिरवणे येथील चौक सजला आहे. महाराजांच्या आगमनासाठी पालिका आयुक्तांपासून ते वनमंत्री गणेश नाईक तसेच आमदार मंदा म्हात्रे तसेच स्थानिक माजी नगरसेवकांची देखील उपस्थिती असणार असल्याची माहिती मिळत आहे.
नेरूळ राजीव गांधी उड्डाणपुलावरून उतरताच पूर्व बाजूस छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. या चौकाला महराजांचे नाव देण्यात आले असले तरी या चौकात कोठेही महाराजांचे अस्तित्व दिसून येत नाही. त्यामुळे या चौकात येणारे नागरिक अनेकदा संभ्रमात पडून शिवाजी महाराज चौक कोठे आहे ? हे विचारताना दिसत होते. मात्र या चौकात महाराजांची मूर्ती बसवून चौकाच्या नावाला साजेसे रूप द्यावे यासाठी देवा म्हात्रे, सतीश शिंदे यांच्यासह अनेक शिवप्रेमी प्रयत्नशील होते. त्यातही पालिका आयुक्त ते जिल्हाधिकारी असे सातत्याने न थकता पत्रव्यवहार करून अखेर या शिवप्रेमींचे स्वप्न सत्यात उतरले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीनंतर या चौकाला शिवशाहीचे रूप देण्यात आले होते. मात्र कित्येक वर्ष महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती मात्र बसविण्यात दिरंगाई होत होती. त्यामुळे शिवप्रेमी आतुरतेने वाट पाहत होते. ही मूर्ती तयार झाल्यावर जिथे ही महाराजांची मूर्ती स्थानापन्न होणार आहे. त्या जागेची विधिवत पूजा करण्यात आली.या शिवपूजनासाठी महाराष्ट्रातील १०८ गडांवरील पवित्र माती तसेच १४ गडांवरील पवित्र जल आणण्यात आले होते.रायगडावरील पारंपरिक पुजारी विजय खिलारे हे स्वतः उपस्थित होते. त्यांनी विधिवत जागेचे पूजन केले होते.सिंहासनारूढ मूर्तीसाठी ४७ लाखांची निविदा काढण्यात आली होती. महाराजांच्या मूर्तीमुळे नेरूळ विभागाच्या या प्रवेशद्वाराला शोभा येणार आहे.
चौक सजला, मावळे सजले, शिवशाही अवतरली
काही दिवसांपासून शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभीकरणाला, अंतिम स्वरूप आले आहे. रंगरंगोटीला वेग आला आहे. संपूर्ण चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. अनेक वर्ष धूळखात पडलेल्या मावळ्यांना सुंदर रूप प्राप्त झाले आहे. तर चौकात ठेवलेल्या शिवकालीन तोफांनी कात टाकली आहे. चौकाच्या घुमटाला मेघडंबरीचे स्वरूप देण्यात आले असून त्याभोवती मातीचे मावळे उभे करण्यात आले आहेत. त्यांच्या हातात भाले तसेच शिवकालीन शस्त्र दिलेली आहेत. सायंकाळी विविध रंगांच्या दिव्यांनी चौकाला अधिक शोभा प्राप्त होणार आहे.
सायन पनवेल महामार्गावरून नवी मुंबईत शिरण्यासाठी नेरूळ येथे एलपी चौक प्रसिद्ध आहे. या चौकातून आत येताच शिरवणे येथे डी. वाय पाटील कोलेजसमोर काही अंतरावर चौक आहे. या चौकाचे नामकरण जरी छत्रपती शिवाजी महाराज चौक असे झालेले असले तरी या चौक महाराजांच्या नावावे ओळखला जावा अशी काहीच ओळख नव्हती. ही बाब सातत्याने शिव प्रेमींना सतावत होती. या चौकाबाबत संभ्रम निर्माण होत होता. या चौकात मेघडंबरी उभारून त्यात महाराजांची मूर्ती उभारण्याऐवजी दगडांचे शिल्प उभारले गेले होते. त्यामुळे शिवप्रेमी नाराजी व्यक्त करत होते. या शहरात नव्याने येणाऱ्या नागरिकांचा पत्ता विचारताना संभ्रम वाढू लागला होता. अनेकदा राज्यातून येणारे नागरिक शिवाजी महाराज चौक शोधण्यास सुरुवात करत असत. मात्र सेक्टर १ मध्ये येऊनही महाराजांचा पुतळा नसल्याने किंवा तशी कोणतीही खूण नसल्याने अनेक नागरिकांची पत्ता शोधताना धांदल उडत होती.