फोटो सौजन्य- प्रतिनिधी
कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.२५) रोजी रायगड जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी कर्जत येथे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त कर्जत येथे घारे यांनी भव्य पदयात्रा काढत विराट शक्तिप्रदर्शन केले. या पदयात्रेला २० ते २५ हजार समर्थक यावेळी उपस्थित होते. यावेळी घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना थेट आव्हान देत त्यांच्यावर जोरदार टीका देखील केली.
माझा पक्ष तुम्ही आहात, माझे उमेदवार तुम्ही आम्ही आहात
यावेळी कर्जत पोलिस ग्राऊंड येथील सभेत बोलताना सुधाकर घारे यांनी कर्जत खालापूरातील जनतेला माझा पक्ष तुम्ही आहात, माझे उमेदवार तुम्ही आम्ही आहात आणि आपल्याला तुमच्या आमच्या सहकार्याने ही निवडणूक लढवायची आहे, या मतदारसंघात आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे. जे जे पक्ष सोबत येतील त्यांना सोबत घेऊन ही निवडणुक आपण लढणार असल्याचे घारे यांवेळी म्हणाले.यावेळी बोलताना घारे म्हणाले, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, जेव्हा संकटाचा काळ होता. तेव्हा शिवाजी महाराजांनी एक एक मावळा निवडून स्वराज्याचे तोरण बांधले, आज आपल्याला देखील कर्जत खालापूरच्या विजयाचं तोरण बांधायचं आहे, असे घारे यावेळी म्हणाले.
सुधाकर घारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने त्यांनी काढलेल्या पदयात्रेला माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, अशोक भोपतराव,भरत भगत, अंकित साखरे, सुरेखा खेडकर, संतोष बैलमारे, भगवान भोईर, भगवान चंचे, मनीष यादव, वैशाली जाधव, रंजना धुळे, अॅड. स्वप्नील पालकर यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
अनेक अदृश्य शक्ती माझ्या सोबत !
सुधाकर घारे यांनी भाषणात आपल्यासोबत अनेक पक्ष येणार, अनेक अदृष्य शक्ती आपल्यासोबत असल्याचे सांगितले. मला तिकीट कोठून मिळेल असे अनेकांना वाटत होते. मात्र मला तिकीटाची आवश्यकता नाही. जनता माझ्या सोबत आहे. असे घारे म्हणाले.
‘आमदार महेंद्र थोरवे यांची हूकुमशाही नष्ट करायची आहे’
सुधाकर घारे म्हणाले, आमदार थोरवे यांनी कोट्यवधींचा विकासनिधी आणल्याच्या वल्गना केल्या जात आहेत.गेल्या निडवणूकीच्या जाहीरनाम्यात थोरवे यांनी जी कामे करण्याचे आश्वासन दिले, त्यातील शुन्य कामे झाली असल्याचे घारे म्हणाले. कोंढाणे धरणाचे काम माजी आमदार सुरेश लाड यांनी मंजूर करुन घेतले. मात्र त्याचे श्रेय आमदार थोरवे लाटत आहेत.मतदारसंघात अन्याय, अत्याचार वाढवण्याचे काम त्यांनी केले आहे, हा अन्याय अत्याचार नष्ट करणार असल्याचे घारे म्हणाले. तालुक्यात पाच वर्षात हुकूमशाही माजली आहे.प्रशानावर दबाव आहे, ही हुकूमशाही नष्ट करायची आहे, असे घारे म्हणाले. रोजगार, आरोग्य शिक्षण, महिला सुरक्षा यामुद्द्यांवरुन देखील घारे यांनी थोरवेंना लक्ष्य केले.
महिलांनी ठिकठिकाणी केले सुधाकर घारे यांचे औक्षण
सुधाकर घारे यांचे या रॅली दरम्यान ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करत जोरदार स्वागत केले. एवढी प्रचंड रॅली पाहण्यासाठी इमारतींच्या गच्चीवरून तसेच रस्त्याच्या दुतर्फा रहिवाश्यांची गर्दी झाल्याचेही पाहायला मिळाले.