Raigad News : काळ आला पण वेळ नाही; मुंबईतील तीन ट्रेकर्सना ढाकभैरी टेकडीवरुन केलं रेस्क्यू
कर्जत/ संतोष पेरणे: “अति घाई आणि संकटात नेई” असं काहीसं मुंबईतील तीन तरुणांच्या बाबतीत झालेलं समोर आलं आहे. कोणत्याही अनुभवी गाईडशिवाय या तरुणांनी ढाक बहिरी डोंगरावर ट्रेक करण्यासाठी गेले. ट्रेकिंगसाठी आलेल्या या तीन तरुणांना कर्जत तालुक्यातील ढाक बहिरी डोंगरावर वाट सापडली नाही. त्यामुळे भरकटलेल्या त्या ट्रेकर्सची कर्जत येथील रेस्क्यू टीमकडून रात्रीच्या गार्ड अंधारात सुटका करण्यात आली. कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध ढाक भैरी कड्यावर ट्रेकसाठी आले होते. कर्जत जवळील ढाक बहिरी येथे आलेल्या मुंबईतील तीन तरुण हेमंत कंक (२४, पवई), रोहित शेवाळे (२५, कोपरखैरणे), आणि गीतेश (२४, ठाणे) हे तिघे ट्रेकर्स सकाळच्या वेळी सांडशी ढाक भैरी ट्रेकसाठी रवाना झाले. प्रारंभिक मार्ग शोधताना बराच वेळ गेला आणि जवळ असलेले पाणीही संपले होते.काही वेळाने ते भैरी गुहेजवळ पोहोचले, परंतु तिथेही रस्ता चुकल्याने ते अडकल्याचे सांगण्यात आले. गीतेशच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि उर्वरित दोघांचे शूज फाटल्याने पुढील प्रवास अत्यंत कष्टप्रद ठरला. त्यात अनोळखी असलेल्या या तरुणांना रस्ते माहिती नसल्याने त्यांना मदत देखील मिळत नव्हती. शेवटी या तरुणांनी महाराष्ट्र माउंटेनियर रेस्क्यू कॉर्डिनेशन सेंटर यांच्याशी संपर्क साधून मदतीची अपेक्षा केली.
महाराष्ट्र माउंटेनियर रेस्क्यू कॉर्डिनेशन सेंटर यांच्या मार्फत रक्षा सामाजिक विकास मंडळ, कर्जत येथील रेस्क्यू टीमच्या अमित गुरव यांना सायंकाळी सात च्या सुमारास यांना कॉल आल्यावर तातडीने पथक रवाना झाले.त्यानंतर अडकलेल्या तर्कर्स यांना वाचविण्यासाठी आवश्यक पाणी, अन्नसामग्री आणि बचाव साहित्य घेऊन सांडशी गावात पोहोचल्यावर स्थानिक तरुणांच्या मदतीने शोधकार्य सुरू झाले.या मोहिमेत सोमनाथ तुंगे (डिकसळ), सुमित हरि गुरव (कर्जत) तसेच स्थानिक तरुण ऋषी कदम व संकेत कदम (सांडशी) यांनी अत्यंत धाडसाने आणि चिकाटीने कामगिरी बजावली. अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री, कठीण मार्गावर झगडत, रात्री १०:३० च्या सुमारास अडकलेल्या तरुणांचा शोध लागला. त्यानंतर सावधगिरीने रात्री १ वाजता सर्वजण सांडशी गावात परतले. स्थानिक तरुणांनी या तिघांची जेवणाची व विश्रांतीची उत्तम व्यवस्था केली आणि रविवार सकाळी त्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या मुंबईतील घरी पाठवण्यात आले. ही संपूर्ण घटना स्थानीय तरुणांतील सामाजिक जबाबदारी आणि रेस्क्यू टीमच्या धाडसी प्रयत्नांचे जिवंत उदाहरण ठरली आहे.
सुमित गुरव, रेस्क्यू टीम मेंबर कर्जत
योग्य माहिती असल्याशिवाय ट्रेकिंगसाठी कोणत्याही अडचणीच्या ठिकाणी जाऊ नये. अडचणीच्या ट्रेकिंगमध्ये परिस्थिती उद्भवल्यास “महाराष्ट्र माउंटेनियर रेस्क्यू कॉर्डिनेशन सेंटर”(MMRCC) या रेस्क्यू टीमला मो. 762-023-0231 संपर्क साधा, असं सांगण्यात आलं आहे.