
रायगडमध्ये महायुतीत पुन्हा ठिणगी! महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप
Raigad News : रायगड जिल्ह्यात महायुतीच्या गोटात सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोपांना आता चांगलीच धार आली आहे. खालापूरमधील रोजगाराच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय वादात कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
खालापूरमधील स्थानिक तरुणांना कंपन्यांमध्ये रोजगार मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनावर टीका करताना थोरवेंनी हा प्रकार म्हणजे स्वतःची झोळी भरण्यासाठी केलेली स्टंटबाजी असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांत हा प्रकार नेमका काय होता, हे सगळ्यांच्या लक्षात येईल, असंही त्यांनी सुनावलं.
महेंद्र थोरवे एवढ्यावरच थांबले नाहीत. खालापूरमधील कंपन्यांना राष्ट्रवादीकडून त्रास देण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. स्थानिकांना रोजगार देण्यासाठी कंपन्या काम करत असताना त्या बंद पाडण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर त्याला ‘जशास तसं उत्तर देऊ’, असा थेट इशाराही त्यांनी दिला.
या सगळ्या वादामुळे रायगडमध्ये महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच रोजगार आंदोलनावरून राष्ट्रवादीकडून कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनीही हस्तक्षेप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती.
दरम्यान, रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष काही नवा नाही. पालकमंत्रीपद, विधान परिषद निवडणूक, स्थानिक राजकारण आणि विकासकामांच्या श्रेयावरून दोन्ही पक्षांमध्ये यापूर्वीही खटके उडाले आहेत.
विधान परिषद निवडणुकीच्या वेळी शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, त्यानंतरही दोन्ही पक्षांमधील राजकीय कुरघोडी थांबताना दिसत नाही.
आता महेंद्र थोरवे यांच्या ताज्या आरोपांमुळे रायगडमधील महायुतीतील वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे. थोरवेंच्या आरोपांवर राष्ट्रवादीकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.