जरांगे मुंबईत धडकणार, सरकारची भूमिका स्पष्ट
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 19 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगे 15 सप्टेंबरला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार असून पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोलीमार्गे आझाद मैदान गाठणार आहेत. त्यांच्या या निर्णयावर महायुतीकडून पहिली प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
प्रवीण दरेकर यांनी मराठा समाजाच्या मागण्या गंभीर असल्याचं मान्य केलं. मराठा समाज मोठा असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने आतापर्यंत पूर्ण सहकार्य केलं आहे. सरकारकडून चर्चा करण्यात आली असून अनेक मंत्री आणि नेते प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊन जरांगेंशी चर्चा करून आले आहेत, असं दरेकर म्हणाले.
मराठा समाजाच्या 14 मागण्यांपैकी 12 मागण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित एक-दोन मागण्या कायद्याच्या चौकटीत अडकलेल्या आहेत. त्यातूनही मार्ग काढण्यासाठी सरकारचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे, असा दावा दरेकर यांनी केला. सरकारने आतापर्यंत जे शक्य आहे ते केलं असून पुढेही चर्चेची दारं खुली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी जेवढं काम केलं, तेवढं यापूर्वी कोणत्याही सरकारच्या काळात झालं नसल्याचंही दरेकर म्हणाले. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि सरकारमधील इतर नेतेही मराठा समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं.
जरांगे यांच्या आंदोलनस्थळी कोण नेता आला किंवा कोण आला नाही, यापेक्षा प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे, असं दरेकरांनी ठणकावून सांगितलं. राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आणि प्रसाद लाड यांच्यासह अनेक नेते जरांगेंना भेटले आहेत. त्यामुळे सरकारने दखल घेतली नाही, असं म्हणता येणार नाही, असा त्यांचा दावा आहे.
मुंबईत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि लोकशाहीत शांततामय आंदोलन करता येतं. मात्र गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे आंदोलनामुळे गणेशोत्सवाला किंवा कायदा-सुव्यवस्थेला गालबोट लागू नये, याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं दरेकर म्हणाले.
मनोज जरांगे यांनीही शांततेची भूमिका घेतली आहे. मराठा समाजाने यापूर्वी शांततेत मूक मोर्चे काढून आपली ताकद दाखवली आहे. त्यामुळे आता आंदोलन करतानाही वातावरण बिघडणार नाही आणि सर्व काही शांततेत होईल, याची दक्षता घ्यावी, असं आवाहन दरेकरांनी केलं.
‘नेमकं काय हवंय ते सांगा, सरकार चर्चेला तयार आहे. मंत्री पाठवले जात आहेत आणि प्रश्नांची दखल घेतली जात आहे,’ असं सांगत दरेकरांनी जरांगेंना पुन्हा एकदा संवादाची भूमिका स्वीकारण्याचं आवाहन केलं.






