मुर्ती लहान पण किर्ती महान ! सात वर्षाची चिमुरडी ठरली दुर्ग लिंगाण्याची विरंगणा
शिवरायांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर पुस्तकं वाचणं आणि गडकिल्ले फिरायला हवं असं कायमच म्हटलं जातं. शिवरायांचा इतिहास आजच्या मुलांना कळायला हवं हीच बाब लक्षात घेत सात वर्षाच्य़ा चिमुरडीने चक्क एक नाही दोन नाही तर तब्बल 121 गड किल्ले सर केले आहे. जागतिक विक्रमवीर आणि महाराष्ट्राची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेली रायगड जिल्ह्यातील अलिबागची कन्या शर्विका म्हात्रे हिने आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे.लिंगाणा हा दुर्ग महाराष्ट्रातील सर्वात कठीण दुर्ग म्हणून ओळखला जातो. सह्याद्री डोंगररांगेतील पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या दुर्गम वाटेवर असलेला हा दुर्ग स्वराज्याचे कारागृह म्हणून देखील प्रसिद्ध आहे,या गडाच्या पायथ्याशी जाणारी वाट देखील थरारक आहे. परंतु या सर्व गोष्टींवर मात करत शर्विका ने ही मोहीम फत्ते केली आहे.
एसटीच्या भाडेवाढीवरुन नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले; जनतेला लुटण्यापेक्षा…
या मोहिमेत तिच्यासोबत 16 गिर्यारोहकांचा देखील समावेश होता.अश्या कठीण गडांच्या मोहिमेसाठी शर्विका राजे शिवाजी वॉल क्लाइंबिंग,पुणे या संस्थेच्या माध्यमातून अमोल जोगदंड आणि मांतू मंत्री या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने गेल्या दोन वर्षापासून सातत्याने प्रशिक्षण घेत आहे. लिंगाणा सारखा राकट किल्ला सर करणं भल्याभल्यांना कठीण जातं. मात्र अवघ्या वय वर्षे सात असलेल्या शर्विका म्हात्रे हिने .यशस्वीरित्या हा किल्ला सर केल्याने राज्याभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शर्विकाला गिर्यारोहणासाठी प्रोत्साहन तिच्या आई वडीलांकडून मिळालं.
या प्रशिक्षणामुळेच तिला या मोहिमेत आत्मविश्वास मिळण्यास मदत झाली तसेच एस एल ॲडव्हेंचर,पुणे या संस्थेच्या माध्यमातून एवरेस्ट वीर लहू उघडे यांच्या माध्यमातून या मोहिमेचे आयोजन केले होते.याच संस्थेतील गिर्यारोहक तुषार आणि केदार यांच्या माध्यमातून ही मोहीम विविध सुरक्षा उपकरणांच्या साहाय्याने यशस्वीपणे पार पडली.या मोहिमेनंतर पुन्हा एकदा शर्विकाने आपले नाव सह्याद्रीच्या प्रवासात अधोरेखित केले आहे. त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शर्विका अडीच वर्षांची असताना शर्विकाने सर्वांत आधी रायगड सर केला होता. त्यानंतर तिने अवघ्या तीन तासांत 3000 फुटांवर ट्रेक करत पुण्यातील जीवधन किल्ला सर केला. हा तिचा शंभरावा किल्ला ठरला होता. या प्रत्येक गड-किल्ल्यावरील माती तिने गोळा केली आहे. शर्विकाचे आईवडील शिक्षक असून तिच्या या अभूतपूर्व कामगिरीची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.पनवेलमधल्या सर्वांत उंच (90 अंश) कलावंतीण किल्ला सर करणारी शर्विका ही राज्यातील सर्वांत लहान मुलगी ठरली आहे. प्रत्येक गड-किल्ल्यावरून आणलेली माती तिने तिच्या घरी जपून ठेवली आहे.
“शर्विकाचा हा प्रवास अत्यंत नैसर्गिकरित्या सुरू झाला आहे. यासाठी तिने कोणतीच शारीरिक प्रशिक्षण घेतलेलं नाही. शर्विकाने गोळा केलेली माती हा ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या मोहिमेचा एक भाग बनणार आहे. पुढच्या वर्षी आम्ही तिला भिंत चढण्याचं प्रशिक्षण देऊ”, अशी प्रतिक्रिया तिचे वडील जितेन यांनी एका मुलाखतीत दिली आहे.