आदित्य ठाकरेंविरोधात वरळीतून उमेदवार का दिला नाही, त्यावर आज राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली
विधानसभा निवडणुकीत सध्या चर्चा आहे ती बारामती आणि माहीम मतारसंघाची. बारामतीत अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर माहीमधून प्रथमच अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहीम मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा आहे कारण राज ठाकरेंनी विनंती करूनही महायुतीकडून या मतदारसंघात उमेदवार देण्यात आला आहे. ठाकरे गटानेही उमदेवार दिला आहे. त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
माहीम मतदारसंघातून सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. दुसरीकडे आदित्य ठाकरे वरळीतून पहिल्यांदा निवडणुकीत उतरले त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्यावेळी उमेदवारी देणं टाळलं आहे. मात्र अमित ठाकरेंवेळी उद्धव ठाकरेंनी ती बांधिलकी पाळली नसल्याची चर्चा आहे. त्यावर राज ठाकरेंनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात भाष्य केलं.
तो पक्ष माझा विरोधक असला तरी तरी राजकारण आणि नातेसंबंधांकडे मी वेगळं बघतो. लहानपणापासून त्या विचारात वाढलो आहे. मला तेव्हा असं वाटलं की वरळीत आदित्य ठाकरेंविरोधा उमेदवार देऊ नये असं वाटलं. मी जसा विचार करतो, तसा सूज्ञ विचार समोरचाही करेलच अशी मी अपेक्षा नाही धरत. मी ती गोष्ट चांगल्या विचारानं केली. समोरच्याला तसं वाटलं तर त्यांनी करावी, नाहीतर करू नये, त्याला फारसं महत्त्व देण्याची गरज नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
त्यावेळी आदीत्य ठाकरेंविरोधात उमेदवार द्यायचा नाही असं ठरवलं, मात्र तेव्हा कुणाला फोन करून सांगितलं नव्हतं. याबाबत कोणाशीह फोनवर बोललो नाही. असं करायला कुणी मला सांगितलंही नव्हतं. आणि सांगायचंच झालं तर गेल्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंची उमेदवारी जाहीर झाली याची मला माहितीही नव्हती. मला समजल तेव्हा वाटलं की तिथे उमेदवार देऊ नये. त्याचं मला वाईटही वाटत नाही. मला त्याच्याशी काहीही देणंघेणं नाही. हा प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग झाला.
माहीमध्ये अमित ठाकरेंविरोधात महायुतीकडून उमेदवार देण्यात आला. भाजपाला ही गोष्ट समजू शकते. पण सर्वच पक्षांना हे समजेल असं नाही. बाकीच्या पक्षाकडून ओरबाडण्याचे प्रयत्न चालू असतात. आपण किती, कुणाला आणि काय काय सांगायला जायचं?, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.