उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांना 5 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून आता वेध लागलेत ते प्रचाराचाचे. सोमवारपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असेल, त्यानंतर राज्यात प्रचाराचा धुरळा उडणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रचाराचा नारळ ५ नोव्हेबरला फुटणार असून एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातही ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांना 5 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिलीच सभा रत्नागिरी येथून म्हणजेच कोकणातून होणार आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानवा जातो. मात्र, लोकसभा निवडणुकीत कोकणातून महायुतीचा उमेदवार विजयी झाला आहे. कोकणातील दोन्ही मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विजयी झाल्यामुळे आता विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंनी सर्व प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यातून निवडणूक प्रचारसभांची सुरुवात करत आहेत.
यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लागली असून उद्धव ठाकरे यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतून जवळपास प्रत्येक पक्षाकडून जवळपास ८५ जागांवर निवडणूक लढण्याव एकमत झालं आहे. १५ जागांचा तिढा आहे. त्यामुळे ठाकरे गटाने ९० हून अधिक जणांना उमेदवारी दिली आहे. ठाकरे गटातील दिग्गज नेते त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.
विधानसभेच्या 288 मतदारसंघातील लढती जवळपास निश्चित झाल्या आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना असणार आहे. त्यामुळे,सर्वच राजकीय पक्ष सर्वस्व पणाला लावून मैदानात उतरले आहेत. ठाकरे, पवार, फडणवीस, शिंदे आणि काँग्रेसमधील दिग्गज नेते स्वत: निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. यंदा प्रथमच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हेही माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही राज्यात 10 ते 15 सभा होणार असल्याची माहिती आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचारसभेत मोदी प्रमुख मतदारसंघात सभा घेतील. भाजपकडून 40 स्टारप्रचारकांची यादाही जाहीर करण्यात आली आहे.